(दावोस / मुंबई)
नवी मुंबई विमानतळ परिसरात एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी, मेडिसिटी आणि जीसीसी सिटी असा बहुआयामी क्लस्टर उभारला जात असून, या एकत्रित प्रकल्पातून सुमारे 35 लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्या निर्माण होणार आहेत. या विकासामुळे नवी मुंबई पुण्याचा रेकॉर्ड मोडेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीदरम्यान दावोस येथे महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारतासाठी आवश्यक अशी इकोसिस्टिम तयार केली असून त्याचा थेट लाभ महाराष्ट्राला होत आहे. यंदाही राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र हे भारतात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी ‘गेटवे ऑफ इंडिया’ आहे. इतर राज्यांशी सकारात्मक स्पर्धा असली तरी महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा अभिमान असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नवी मुंबई परिसरात उभ्या राहत असलेल्या ‘तिसऱ्या मुंबई’साठी मोठ्या गुंतवणुकीचे संकेत मिळत असून, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राज्याकडे मजबूत ‘मेन्यू कार्ड’ आहे, असे त्यांनी नमूद केले.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे गुंतवणूकदारांसाठी चावडी
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक ही उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. महाराष्ट्राची क्षमता आणि संधी जगासमोर मांडण्यासाठी दरवर्षी येथे सहभाग घेतला जातो. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक गुंतवणूक येईल, असा विश्वास असून आतापर्यंत 60 ते 65 करार प्रत्यक्षात आणण्यात महाराष्ट्र यशस्वी ठरल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
2030 पर्यंत ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था
गेल्या दशकात महाराष्ट्राने 10 टक्क्यांहून अधिक विकासदर राखला आहे. राज्य 2032 पर्यंत ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनू शकते, मात्र हे उद्दिष्ट 2030 पर्यंत गाठण्याचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जागतिक आव्हानात्मक परिस्थितीतही भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेतील ‘ब्राइट स्पॉट’ असून महाराष्ट्राचा विकासदर मजबूत राहिला आहे.
देशातील 39 टक्के एफडीआय महाराष्ट्रात
गेल्या वर्षी भारतात आलेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी 39 टक्के एफडीआय महाराष्ट्रात आला आहे. 15 ते 16 धोरणांमुळे गुंतवणूकदारांसाठी सक्षम आणि विश्वासार्ह इकोसिस्टिम तयार झाली आहे. गुंतवणुकीची कमतरता नसून योग्य वातावरण महाराष्ट्रात उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
एमएसएमई, स्टार्टअप्स आणि एआयवर भर
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे अर्थव्यवस्थेचा कणा असून रोजगारनिर्मितीत त्यांचा मोठा वाटा आहे. स्टार्टअप्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीजमध्ये महाराष्ट्र आघाडी घेऊ शकतो. देशातील 60 टक्के डेटा सेंटर क्षमता महाराष्ट्रात असून राज्य ‘डेटा सेंटर कॅपिटल’ म्हणून पुढे येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
वाढवण बंदर पुढील 100 वर्षांचा विकासकेंद्र
वाढवण बंदर हे जेएनपीटीपेक्षा तीनपट मोठे असून जगातील टॉप 10 बंदरांपैकी एक ठरेल. पुढील तीन वर्षांत पहिला टप्पा कार्यान्वित होणार असून, हे बंदर पुढील 100 वर्षांसाठी भारताच्या सागरी व्यापाराला बळ देईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. उद्योगविकासासाठी कायदा व सुव्यवस्था महत्त्वाची असून महाराष्ट्रात झिरो टॉलरन्स धोरण राबवले जात आहे. राज्यातील गुंतवणूक सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सर्वोत्तम असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

