(नागपूर)
मानवी शरीररचनेत प्रत्येक अवयवाची एक ठराविक जागा असते. सर्वसाधारणपणे हृदय हे छातीच्या डाव्या बाजूला असते. मात्र जगात अत्यंत दुर्मीळ स्वरूपात काही व्यक्तींमध्ये हृदय उजव्या बाजूला असते. अशीच एक दुर्मीळ वैद्यकीय केस नागपूर जिल्ह्यात समोर आली असून 70 वर्षीय आजींचे हृदय उजव्या बाजूस असल्याचे तपासणीत उघड झाले आहे.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील रहिवासी असलेल्या 70 वर्षीय आजींना छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची प्राथमिक तपासणी व ईसीजी करण्यात आला. ईसीजी अहवालात हृदयाशी संबंधित बदल आढळून आले.
त्यानंतर पुढील तपासणीदरम्यान प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हितेंद्र भागवतकर यांना इको तपासणीत एक वेगळीच बाब लक्षात आली. हृदय नेहमी ज्या ठिकाणी असते तिथे दिसत नसल्यामुळे रुग्णाचे हृदय उलट बाजूला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. सखोल तपासणीनंतर संबंधित आजींचे हृदय उजव्या बाजूस असल्याचे स्पष्ट झाले.
सर्व रक्तवाहिन्या उलट बाजूला
या दुर्मीळ निदानानंतर डॉ. हितेंद्र भागवतकर यांनी तातडीने अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. हृदयाची रचना पूर्णपणे वेगळी असल्यामुळे उपचार प्रक्रिया अत्यंत जटिल होती. हृदयाच्या सर्व रक्तवाहिन्या उलट बाजूने असल्याचे निदर्शनास आले. तरीही अनुभवी डॉक्टरांच्या टीमने काळजीपूर्वक अँजिओग्राफी यशस्वीरीत्या पूर्ण केली.
तपासणीत हृदयाच्या मुख्य रक्तवाहिनीत म्हणजेच LAD धमनीमध्ये सुमारे 90 टक्के अडथळे (blockges) आढळून आले. त्यानंतर सर्व आवश्यक खबरदारी घेत रुग्णावर यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली. सध्या संबंधित आजींची प्रकृती स्थिर असून त्या पूर्णपणे ठणठणीत आहेत. उपचारानंतर कोणतीही गुंतागुंत उद्भवली नाही. यशस्वी उपचारानंतर त्यांना चांगल्या अवस्थेत घरी पाठवण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

