(चिपळूण)
चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून कार्यरत असलेले विशाल श्रीरंग भोसले यांची पदोन्नतीने बदली झाली आहे. ते आता सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या जागी संजय जाधव हे चिपळूण नगर परिषदेचे नवे मुख्याधिकारी म्हणून लवकरच रुजू होणार आहेत. ही प्रशासकीय बदली १९ जानेवारी रोजी शासनाचे अवर सचिव अशोक लक्कस यांनी जारी केलेल्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या कार्यकाळात चिपळूण शहराच्या विकासाला ठोस दिशा मिळाली. आरोग्य व्यवस्था, पाणीपुरवठा आणि स्वच्छता या मूलभूत सेवांवर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण नगर परिषदेला ‘माझी वसुंधरा’ अभियानात कोकण विभागात प्रथम क्रमांक, तर राज्यात १४वा क्रमांक मिळाला.
नव्या पिढीमध्ये वाचनसंस्कृती वाढावी यासाठी दर रविवारी ‘वाचू आनंदाने’ हा उपक्रम राबवण्यात आला. तसेच इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी दर महिन्याच्या १ तारखेला ‘सायकल डे’ उपक्रम सुरू करण्यात आला. या दिवशी अधिकारी आणि कर्मचारी सायकलने किंवा पायी कार्यालयात येत असत. स्वतः मुख्याधिकारी विशाल भोसले नियमितपणे सायकलने नगर परिषदेत येत असल्यामुळे या उपक्रमाला मोठी प्रेरणा मिळाली.
चिपळूण शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. लोकाभिमुख, पर्यावरणपूरक आणि नवोन्मेषी उपक्रमांमुळे चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली असून, विशाल भोसले यांच्या कार्यकाळाची शहरवासीयांकडून सकारात्मक दखल घेतली जात आहे.

