(दापोली)
दापोली पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित दोन दिवसांच्या क्रीडा महोत्सवाचे के.के.व्ही. दापोलीच्या प्रांगणात उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी गणेश मंडलीक, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचीव संतोष सावर्डेकर आणि गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांच्या हस्ते कार्यक्रम सुरू झाला.
यावेळी बोलताना गटविकास अधिकारी गणेश मंडलीक यांनी सांगितले की, खेळाला अभ्यासापेक्षा कमी लेखू नये, खेळामुळे मन आणि शरीर स्वस्थ राहते, परिणामी खिलाडूवृत्तीमुळे सुजाण आणि सजग नागरिक तयार होतात
कुलसचीव सावर्डेकर यांनी सांगितले की, जिल्हा परिषद शाळा म्हणजे शिक्षणाचा पाया आणि यशस्वी जीवनाचा कणा आहे. महोत्सवात वैयक्तिक खेळ जसे की धावणे, उंच उडी, लांब उडी, थाळी गोळा फेक तसेच सांघिक खेळ कबड्डी, खोखो, लंगडी खेळवले जात आहेत. यातून जिल्हास्तरीय खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
उद्घाटनपूर्वी गिम्हवणे शाळेच्या स्काऊट-गाईड समूहाने उत्कृष्ट संचलन सादर केले, जालगाव शाळेने लेझीमचे विविध प्रकार, तर कर्दे शाळेतील विद्यार्थ्यांनी लाठी-काठीसह ‘शिवगर्जना’ सादर केली. शौकत ऐनरकर यांनीही लाठी-काठीचे प्रात्यक्षिक दाखविले. तदनंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलीत करून स्पर्धेला प्रारंभ झाला.
सुत्रसंचालन स्वागत समितीचे संजय मेहता, शशिकांत बैकर आणि बनसोड यांनी केले. यावेळी विस्तार अधिकारी बळीराम राठोड, मेघा पवार, सुधाकर गायकवाड, सर्व केंद्रप्रमुख आणि तालुक्यातील शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

