( देवळे / प्रकाश चाळके )
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील साखरपा जाधववाडी येथील सतीमातेचा यात्रौत्सव २ जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. या यात्रेला सुमारे सत्तर वर्षाचा इतिहास लाभला आहे. एक जागरूक देवस्थान म्हणून परिचित असून, नवसाला पावणारी भक्तांच्या मनोकामना पुर्ण करणारी आणि संकटकाळी भक्तांच्या पाठीशी उभी राहून भक्तांचे रक्षण करणारी अशी अख्यायिका सतीमाता देवीची आहे.
ही यात्रौत्सवाची धामधूम दोन दिवस असते. यात्रेच्या आदल्या दिवशी १ जानेवारी रोजी साखरपा जाधववाडीत सतीमातेला रूपे लावून देवीला फुलांनी सजवलेल्या पालखीत बसविली जाते व ती देवाच्या सानेवर आणली जाते. त्यादिवशी सत्यनारायणाची महापूजा व सायंकाळी उशीरा पालखी बहुसंख्य भक्तांच्या उपस्थितीत नाचवली जाते.
यावेळी लांबलांबचे भक्तगण उपस्थित असतात. ढोल ताशांचा गजर सतीमातेचा जयघोष फटाक्यांची आतिषबाजी यामुळे सारा परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होते व रात्री करमणूकीचा कार्यक्रम ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सतीमातेची पालखी वाजत गाजत भक्तांच्या उपस्थितीत सतीमातेच्या मंदिरात आणली जाते व पारंपरिक विधी होऊन यात्रेत्सवाला सुरुवात होते.
दिवसरात्र साजरा होणाऱ्या या यात्रौउत्सवाला जिल्ह्याबरोबर जिल्ह्याच्या बाहेरील भक्तगण देवीच्या दर्शनाला व तीचे आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात. संगमेश्वर तालुक्यातील मोठी यात्रा म्हणून याकडे पाहिले जाते. यावेळी गावातील मानकरी गावकरी भक्तगण ग्रामस्थ आतापासूनच सतीमातेच्या यात्रौत्सवासाठी तयारीत गुंतला आहे.
या यात्रौत्सवाची सांगता रात्री करमणूकीचा कार्यक्रम सर्वत्र गाजलेला सदाबहार आर्केस्ट्रा तुफान या कार्यक्रमाने यात्रौत्सवाची सांगता होणार आहे.

