( संगमेश्वर / प्रतिनिधी )
व्यापारी पैसा फंड संचलित पैसा फंड इंग्लिश स्कुल संगमेश्वर या प्रशालेत नववीच्या वर्गात शिकणाऱ्या निढळेवाडी संगमेश्वर येथील रिषभ विश्वनाथ नरबेकर या विद्यार्थ्याने रेखाटलेले एका अप्रतिम चित्राची पुणे येथील चपराक प्रकाशनने त्यांच्या बाल कुमारांसाठी असणाऱ्या लाडोबा या जानेवारी महिन्याच्या मासिकाचे मुखपृष्ठ म्हणून निवड केली आहे. रिषभच्या या यशासाठी त्याचे अभिनंदन केलं जात आहे.
पैसा फंड इंग्लिश स्कुलने कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कलावर्ग आणि कलादालन हा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होत आहे. कलासाधना चित्रकला वार्षिक, डिजिटल कला शिक्षण, विविध प्रात्यक्षिके, कला विषयक प्रोजेक्ट या सर्वांचा विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील कला शिक्षणासाठी उपयोग होत असतो. प्रशालेत कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करुन घेतला जाणारा सातत्यपूर्ण सराव हेच विद्यार्थ्यांच्या कला क्षेत्रातील यशाचे खरे गमक आहे. यामुळेच शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल नेहमीच १०० टक्के लागून विद्यार्थी अ आणि ब श्रेणी प्राप्त करतात.
रिषभ विश्वनाथ नरबेकर हा नववीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी स्वभावाने शांत आणि नम्र असून त्याची चित्रकला चांगली असल्यामुळे त्याच्या कलेवर विशेष लक्ष दिल्यानंतर त्याच्या कलेत अधिक प्रगती होत असल्याचे दिसून आले. रिषभ याने ए्लिमेंटरी या शासकीय रेखाकला परीक्षेत अ श्रेणी प्राप्त केली आहे. गत वर्षी प्रशालेच्या कलासाधना या रौप्य महोत्सवी चित्रकला वार्षिकचे मुखपृष्ठ रिषभ यानेच केले होते. त्याने रेखाटलेल्या काही कलाकृती मधील कासवाचे चित्र पुणे येथील आघाडीच्या चपराक आणि लाडोबा प्रकाशनने जानेवारी २०२६ च्या त्यांच्या मासिकच्या मुखपृष्ठासाठी निवड करुन रिषभच्या कलेचा गौरव केला आहे.
चपराक प्रकाशनने पैसा फंड प्रशालेतील विद्यार्थी रिषभ विश्वनाथ नरबेकर याच्या चित्राचा असा आगळावेगळा सन्मान केल्याबद्दल संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक प्रकाश दळवी, रिषभचे पालक विश्वनाथ नरबेकर यांनी चपराक आणि लाडोबा प्रकाशनचे संपादक घनश्याम पाटील, ऑनलाईन संपादक ज्योती पाटील यांना मनापासून धन्यवाद दिले आहेत.तसेच रिषभ याच्या कलेचे कौतुक करुन त्याचे अभिनंदन केले आहे .

