(पुणे)
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही पवार गट एकत्र लढूनही मतदारांनी त्यांना नाकारत भाजपला स्पष्ट कौल दिला. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपची सरशी ठरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी राजकीय हालचाल सुरू झाली असून बारामतीत काका-पुतण्यांमध्ये महत्त्वपूर्ण खलबतं झाल्याची माहिती आहे.
महापालिका निवडणुकांतील पराभवानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीतील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत तब्बल तास-दीड तास सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच आमदार रोहित पवार उपस्थित होते.
या चर्चेत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही तालुक्यांमध्ये दोन्ही पवार गट एकत्र निवडणूक लढवतील, तर काही ठिकाणी शरद पवार गट स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्टीकरण बैठकीनंतर आमदार रोहित पवार यांनी दिले.
एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत चर्चा
या बैठकीत निवडणूक चिन्हाबाबतही महत्त्वाची चर्चा झाल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार हे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांशी एकाच चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत चर्चा करत असल्याचे समजते. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकच चिन्ह ठेवण्यावर दोन्ही गटांमध्ये सकारात्मक वातावरण असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, २९ महापालिकांच्या निकालानंतर आत्मचिंतनाची गरज असल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. तसेच १२ जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असून दोन्ही पवार पुन्हा एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या घडामोडींमुळे फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

