(नवी दिल्ली)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकोनॉमिक फोरम (WEF) 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी (१८ जानेवारी) स्वित्झर्लंडमधील झ्युरिक येथे पोहोचले. पाच दिवसांच्या या परदेश दौऱ्याच्या प्रारंभी झ्युरिकमध्ये मराठी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि राज्यगीताच्या गजरात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. महाराष्ट्राच्या राज्यगीताने झ्युरिकमधील सभागृह दुमदुमून गेले.
स्वित्झर्लंडमधील भारताचे राजदूत मृदुलकुमार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे औपचारिक स्वागत केले. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि किंजारापू राम मोहन नायडू यांनीही त्यांची भेट घेत महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांतील मोठ्या यशाबद्दल अभिनंदन केले.
झ्युरिकमध्ये भेटीस आलेल्या अनेक भारतीय आणि मराठी नागरिकांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांना नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांतील यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित स्वागत कार्यक्रमात ‘स्वागत देवाभाऊ’ असा फलक लावण्यात आला होता. यामुळे परदेशातही महाराष्ट्राच्या राजकीय यशाची चर्चा रंगताना दिसली.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे समन्वयक अमोल सावरकर यांनी स्वित्झर्लंडमधील विविध शाळांमध्ये मराठी भाषेचे वर्ग सुरू करण्याचा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती दिली. फडणवीस यांच्या या स्वागताने स्थानिक आणि जागतिक मराठी समुदायामध्ये उत्साह वाढवला असून, त्यांच्या राजकीय प्रवासावर लक्ष केंद्रीत झाले आहे.
स्वित्झर्लंडच्या बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. राज्यात ‘महा-एनआरआय फोरम’ची स्थापना करण्यात आली असून, स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषेला नवी दिशा देण्याचा त्यामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सांस्कृतिक वैभव जपल्याशिवाय भौतिक प्रगती शक्य नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी पुढील पाच वर्षांत मुंबईला विकसित राष्ट्रांच्या राजधानींपेक्षा अधिक प्रगत करण्याचा संकल्प व्यक्त केला.
जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात मराठी माणूस मेहनती, विश्वासार्ह आणि प्रगत म्हणून ओळखला जात असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी काढले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्विस शहर झ्युरिकमध्ये पारंपरिक मराठी पद्धतीने स्वागत करण्यात आले. या स्वागताच्या प्रसंगावरून उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेशात स्वागत जेव्हा होते, अगदी तसेच स्वागत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे झ्युरिक येथे करण्यात आले, ही प्रत्येक मराठी माणसाला आनंद देणारी गोष्ट आहे.”
त्यांनी पुढे लिहिले, “महापालिका निवडणुकीत भरघोस विजय मिळवल्यानंतर फडणवीस यांचा प्रवास दिल्लीतील सर्वोच्च पदासाठी सुरू झालेला दिसतोय.”

