(पनवेल)
पनवेल शहरातील तक्का विभागात एक हृदयद्रावक घटना घडली. स्वप्नालय मुलींच्या बालगृहाबाहेर एका बास्केटमध्ये दोन दिवसांचे नवजात बाळ आढळून आले. त्या बास्केटमध्ये दूध पावडर, बाटली, कपडे आणि एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी होती. या चिठ्ठीत पालकांनी मुलाला तिथे सोडल्याबद्दल ‘माफ करा’ अशी भावनिक विनंती केली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी त्वरीत तपास सुरू केला आणि काहीच तासांत बाळाचे पालक सापडले.
प्रेमसंबंधातून जन्मलेले बाळ, कुटुंबीयांचा विरोध
तपासात समोर आले की बाळाच्या आई-वडिलांचे लग्न झालेले नाही. त्यांच्यातील प्रेमसंबंधातून हे बाळ जन्माला आले. मात्र कुटुंबीयांनी या नात्याला स्वीकारले नाही. बाळाच्या आईला भिवंडी येथील माहेरी पाठवण्यात आले होते. आठव्या महिन्यातच बाळाचा जन्म झाला आणि त्यानंतर आर्थिक व सामाजिक अडचणींमुळे त्यांनी बाळाला अनाथाश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला. बाळाच्या वडिलांचे नाव xxxx कोंडकर असं असून तो भिवंडीचा रहिवाशी आहे.
तक्का विभागात असलेल्या स्वप्नालय या मुलींच्या बालगृहाजवळ, फुटपाथवर दोन दिवसांचं नवजात बाळ सापडलं. हे बालगृह महिला आणि बालविकास विभाग, महाराष्ट्र शासनाचे मान्यताप्राप्त असून, या संस्थेच्या इमारतीच्या खालच्या भागातच एका बास्केटमध्ये बाळ आढळून आलं. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बास्केटमध्ये बाळाबरोबर सेरेलॅक, कपडे आणि एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठीही सापडली.
चिठ्ठीतून वेदना
बाळासोबत सापडलेली चिठ्ठी इंग्रजीमध्ये लिहिलेली होती. (त्याचा मराठीमध्ये अर्थ असा दिलेला आहे) “मी माझ्या बाळाचा सांभाळ करू शकत नाही. माझी आर्थिक परिस्थिती आणि मानसिक अवस्था खूपच बिकट आहे. माझ्या बाळाची हेळसांड होऊ नये म्हणून त्याची जबाबदारी घेण्यात यावी. भविष्यात शक्य झाल्यास मी त्याला भेटायला येईन. कृपया मला माफ करा.” अशा शब्दांमधून पालकांनी आपली असहाय्यता आणि मनोव्यथा व्यक्त केली होती.
सध्या बाळ वात्सल्य ट्रस्ट या संस्थेत सुरक्षित आहे. पोलिसांनी आई-वडिलांना ताब्यात घेतले असून त्यांनी आता बाळाचा सांभाळ करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संबंधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच बाळ त्यांच्या स्वाधीन करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पनवेल पोलिसांनी दाखवलेल्या तात्काळ कारवाईचे आणि संवेदनशील भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

