( मुंबई )
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ चा निकाल गुरुवारी रात्री उशिरा जाहीर केला. या निकालात सोलापूरच्या विजय नागनाथ लमकणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे सोलापूर जिल्ह्यात तसेच स्पर्धा परीक्षा परीक्षार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एमपीएससीतर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षा २७ ते २९ मे २०२४ दरम्यान पार पडली होती. त्यानंतर पात्र उमेदवारांच्या मुलाखती ३० ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आल्या. या परीक्षेसाठी एकूण १,५१६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. मुलाखतींच्या अखेरच्या टप्प्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा आयोगाने अंतिम निकाल प्रसिद्ध केला.
या निकालात हिमालय घोरपडे यांनी राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे, तर नागपूरच्या प्रगती जगताप हिने अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, विजेता विजय लमकणे हे आधीच एमपीएससीतून विविध पदांवर निवड झालेले अधिकारी असून सध्या ते गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
यंदाच्या राज्यसेवा परीक्षेत महिलांनीही प्रभावी कामगिरी केली आहे. महिलांमध्ये आरती जाधव या राज्यात प्रथम क्रमांकावर आल्या आहेत, तर एससी प्रवर्गातील प्रगती जगताप यांनीही उत्तुंग यश संपादन केले आहे. प्रगती जगताप सध्या नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
या निकालामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अनेकांनी आपल्या स्वप्नातील सेवेत प्रवेश मिळवला असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेषतः विजय लमकणे यांच्या यशाने ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी नवी प्रेरणा निर्माण केली आहे.
हा निकाल आरक्षणाच्या समांतर आरक्षणाशी संबंधित मुद्द्यांसह विविध न्यायालये व न्यायाधिकरणांमध्ये प्रलंबित असलेल्या न्यायिक प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे. थोडक्यात, हा निकाल न्यायालयीन निर्णयांच्या अधीन आहे. त्यामुळे निकालात ऐनवेळी काही बदल अपेक्षित आहेत.

