( बुरंबी / नरेश जागुष्टे )
मध्यप्रदेशातील भोपाळ येथे मध्यप्रदेश सांस्कृतिक विभाग व जनजातीय संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महुआ महोत्सव’ ६ ते १० जून या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडला. हा महोत्सव जनजातीय संग्रहालयाच्या १२ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता.
या राष्ट्रीयस्तरीय महोत्सवात भारतातील विविध राज्यांतील लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी विविध कलाकारांना निमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्रथमच श्री देवी वाघजाई सांस्कृतिक कलामंच, तेर्ये या नामवंत मंडळाला प्राप्त झाली.
या कलामंचाचे प्रमुख श्री. राजेंद्र दत्ताराम बाईत व त्यांच्या चमूने पारंपरिक कोळी नृत्य सादर करत महाराष्ट्रातील कोकणी संस्कृतीची झलक प्रेक्षकांसमोर सादर केली. कोळी समाजाच्या जीवनशैलीचे सजीव चित्र उभे करणाऱ्या या नृत्य सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली, तर आयोजकही भारावून गेले. मध्यप्रदेश सरकारकडून सहभागी कलाकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कलाप्रेमी राजेंद्र बाईत यांना लोककलेचा वारसा त्यांच्या वडिलांकडून लाभलेला आहे. दत्ताराम बाईत हे पहाडी आवाजाचे नामवंत लोकशाहीर व कवी होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले राजेंद्र बाईत हे स्वतः उत्कृष्ट वादक, संगीतकार व लोकसंगीतातील जाणकार असून, त्यांनी अनेक गीते संगीतबद्ध केली आहेत. ‘नमन’ या पारंपरिक कलाप्रकाराच्या माध्यमातून ते अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या लोककलेचे जतन व संवर्धन करत आहेत.
या यशामागे मंचातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अविरत योगदान आहे. सतीश पवार, उमेश बाईत, अजित मोहिते, उदय भुरवणे आणि सुभाष पवार यांनी अहोरात्र मेहनत घेऊन मंच नावारूपाला आणण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
श्री. देवी वाघजाई सांस्कृतिक कलामंचाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि त्यांच्या कार्याची दखल राज्यपातळीवर घेतली जात आहे.