( मुंबई )
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांशी संपर्क साधला जात असल्याची जोरदार चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नगरसेवक मुंबईतील ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहेत.
महायुतीला काठावर बहुमत मिळाल्याने शिंदे गटाची बार्गेनिंग पॉवर वाढली असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून भाजपकडे अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. स्थायी समितीसह अन्य महत्त्वाच्या समित्यांवरही शिवसेना आग्रही राहू शकते. या संभाव्य घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी सावध भूमिका घेतल्याचे समजते. मात्र भाजपचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापौरपदाबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबई महापालिकेत एकूण २२७ जागा असून बहुमतासाठी ११४ नगरसेवकांची आवश्यकता आहे. भाजपकडे सध्या ८९ नगरसेवक आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे २९ नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे गटाच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. निवडणुकीत शिंदे गटाने ९२ जागा लढवून २९ जागांवर विजय मिळवला आहे. उद्धव ठाकरे गटाचे ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसला २४, मनसेला ६, एमआयएमला ८, राष्ट्रवादी काँग्रेसला २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाला १ जागा मिळाली आहे.
हालचालींकडे बारीक लक्ष
“मुंबईचा महापौर भाजपचा होऊ नये, ही सर्वांची भावना आहे. देवाची इच्छा असेल तर ठाकरे गटाच्या शिवसेनेचाच महापौर बसेल,” असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचाही त्यांनी उल्लेख केला. “अनेकांशी चर्चा सुरू आहेत. बहुमत कितीही मोठं असो, ते चंचल असतं,” असं राऊत म्हणाले.
नगरसेवक कोंडले तरी संदेश येतात
“तुम्ही नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार? ते मूळचे शिवसैनिक आहेत. मराठी अस्मितेची ज्योत त्यांच्या मनात धगधगत आहे. भाजपचा महापौर नको, हे ठरलेलं आहे. नगरसेवक कोंडले असले तरी संदेश येत असतात,” असा दावा संजय राऊत यांनी केला.
शिंदेंकडून अधिकृत मागणी नाही : बावनकुळे
शिंदे गटाच्या संभाव्य मागणीवर प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “महापौरपदाबाबत माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आमचा पार्लमेंटरी बोर्ड आहे. समन्वय समितीत देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र बसून निर्णय घेतील. काही मागणी असेल तर शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतील.”
मुंबई महापालिकेतील सत्तास्थापना आता केवळ आकड्यांची नव्हे, तर राजकीय डावपेचांची लढाई ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

