(लांजा/ रत्नागिरी)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजनारी पुलावर अपघातांची मालिका सुरूच असून, सलग दुसऱ्या दिवशी या ठिकाणी अपघाताची घटना घडली आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने मच्छीची वाहतूक करणारा कंटेनर गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास पुलावर उलटल्याने काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे अंजनारी पुलावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर क्रमांक MH 43 BP 1960 हा मुंबईहून गोव्याच्या दिशेने मच्छीचा साठा घेऊन जात होता. गुरुवारी सकाळी सुमारे ६.३० वाजता अंजनारी पुलावर आले असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर महामार्गावरच कलंडला. या अपघातात कंटेनरचे नुकसान झाले असून, अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यासाठीही कार्यवाही करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास तपास अंमलदार वाडकर करीत आहेत.
अंजनारी पुलावर सलग दोन दिवस अपघात घडल्याने या मार्गावरील वाहतूक सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पुलावरील वळण, वाहनांचा वेग, रस्त्याची स्थिती किंवा अन्य तांत्रिक बाबी अपघातांना कारणीभूत ठरत आहेत का, याची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. अपघाताचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार असले, तरी वारंवार घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी अंजनारी पुलाची पाहणी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, वाहनचालकांना सावधानतेचे स्पष्ट संकेत मिळतील अशी व्यवस्था करावी आणि अपघातांचा धोका कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


