(रत्नागिरी /प्रतिनिधी)
दारूच्या नशेत नॉनव्हेज चायनीज पदार्थाचे पार्सल घेऊन घरी आलेल्या पतीने पत्नीशी झालेल्या वादातून तिच्या डोक्यात दगड घालून जखमी केल्याची घटना भाटये महाजनवाडी येथे घडली. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास भाटये महाजनवाडी येथे घडली. आरोपी कैलास सुधीर भाटकर हा दारू पिऊन नॉनव्हेज चायनीज पदार्थाचे पार्सल घेऊन पत्नी गौरी कैलास भाटकर यांच्या घरी आला. यावेळी गौरी भाटकर यांनी, ‘‘तू घरी का आलास? आज तुला बायको आणि मुलाची आठवण कशी काय झाली? तू रुचीसोबत राहा,’’ असे म्हटल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपीने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आईला शिवीगाळ होत असल्याचे पाहून त्यांचा मुलगा कु. आराध्य याने, ‘‘बाबा, माझ्या आईला शिव्या देऊ नका,’’ असे सांगितले. त्यावेळी संतापलेल्या आरोपीने मुलाचा हात पकडून त्याला घराबाहेर रस्त्यावर नेले. मुलाला आरोपीच्या ताब्यातून सोडविताना गौरी यांनी, ‘‘मुलाला हात लावायचा नाही, भांडण आपले दोघांचे आहे,’’ असे सांगितले.
मुलाला आपल्या ताब्यात घेतल्याचा राग आरोपीला आला. संतापाच्या भरात त्याने तेथील दगड उचलून पत्नी गौरी यांच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात गौरी भाटकर यांच्या डोक्याला दुखापत झाली. या घटनेनंतर गौरी भाटकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी कैलास सुधीर भाटकर याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक २८७/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ११८(१) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जुन्या भारतीय दंड विधानातील कलम ३२४ व ५०४ शी संबंधित तरतुदींचाही उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

