(कोल्हापूर)
महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने दणदणीत यश मिळवल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या समरजीत घाटगे यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश लवकरच होणार आहे. राज्याचे तंत्र आणि उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीची एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
रविवारी (१८ जानेवारी) कोल्हापूर येथे झालेल्या महायुतीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणनीती ठरवण्यात आली. या बैठकीस मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, समरजीत घाटगे हेही या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळाला आहे.
बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, “समरजीत घाटगे पुन्हा एकदा भाजपच्या व्यापक विचारधारेत आले आहेत. पक्षप्रवेशाची केवळ तांत्रिक प्रक्रिया बाकी असून ती लवकरच पूर्ण होईल. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्यांचे कार्यकर्ते कमळ चिन्हावरच निवडणूक लढवतील.”
महायुती मजबूत ठेवण्यावर भर देताना पाटील म्हणाले, “यापूर्वी जिल्हा परिषदेत जे घडले, तसं पुन्हा व्हायचं नसेल तर युती अधिक भक्कम करावी लागेल. प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची असते, पण युती झाली तर सर्वांनाच फायदा होतो.” तसेच सांगलीतही निवडणुकीनंतर अशाच प्रकारची युती करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
पूर्वी भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष असलेले समरजीत घाटगे हे विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये गेले होते. मात्र अलीकडे सोशल मीडियावरून त्यांनी तुतारी चिन्ह हटवल्यानंतर त्यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाच्या चर्चांना वेग आला होता. आता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत त्यांचा अधिकृत भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे.
कागलमध्ये आधीच शाहू गटासोबत महायुती झाली असून, जिल्हा परिषदेतही अशीच मजबूत युती झाल्यास एकतर्फी आणि ऐतिहासिक निकाल लागेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीत महायुतीला यश मिळवून देण्यासाठी समरजीत घाटगे यांची भूमिका निर्णायक ठरणार असून, कोल्हापूरच्या राजकारणात हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.

