(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष दीपक प्रकाश दुर्गवळी यांचे वडील प्रकाश गोपाळ दुर्गवळी यांचे शनिवारी दुपारच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.
कै. प्रकाश दुर्गवळी हे मालगुंड दुर्गवळीवाडी येथील नामवंत नमन कलाकार म्हणून ओळखले जात. त्यांनी कोकणची लोककला जाकडी शक्ती तुरा तसेच नमन या लोककलेमध्ये एक सर्वोत्तम शाहीर म्हणून गायकी करणारा कलावंत आणि नमन या लोककलेमध्ये पेंद्या सुदामची भूमिका अत्यंत उठावदार व उत्कृष्ट अभिनय करून साकारणारा लोकप्रिय कलाकार म्हणून आपले नावलौकिक प्राप्त केले होते. मालगुंड आग्राडी व दुर्गवळीवाडी येथील जाकडी कलापथक आणि नमन मंडळांमध्ये त्यांनी कलाकार म्हणून आपले सर्वोत्तम योगदान दिले होते. त्यामुळे एक हरहुन्नरी आणि नव्या पिढीला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरणारा कलाकार हरपल्याची भावना आग्राडी दुर्गवळीवाडी येथील जाकडी कलापथक आणि नमन मंडळांकडून व्यक्त करण्यात आली.
अतिशय शांत, प्रेमळ आणि मनमिळावू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी म्हणून सुमारे दहा वर्ष अतिशय प्रामाणिकपणे काम केले होते. तसेच वाडीतील धार्मिक आणि सामाजिक कामकाजात त्यांचा सक्रिय सहभाग असे. आपल्या आयुष्यात त्यांनी संसाराचा गाडा हाकताना प्रचंड मेहनत आणि काबाडकष्ट करून मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार देऊन त्यांना सन्मार्गावर लावले. म्हणूनच त्यांचे मोठे चिरंजीव दीपक दुर्गवळी यांनी मालगुंड गावच्या इतिहासात सर्वप्रथम थेट सरपंच होण्याचा बहुमान प्राप्त करून आपल्या आईवडिलांचे व कुटुंबाचे नाव जनमानसात उमटवले.
कै. प्रकाश दुर्गवळी यांच्या निधनाची बातमी समजताच दीपक दुर्गवळी यांचे सर्व नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेसाठी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, भावजय, दोन मुलगे,एक मुलगी, जावई ,सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाप्रसंगी विविध स्तरातून भावपूर्ण श्रद्धांजली व आदरांजली व्यक्त करण्यात आली आहे.

