(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील महसूल विभागाच्या कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून पाचल येथील अनेक वर्षे जुनी तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी कार्यालयाची इमारत मंगळवार, दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी पाडण्यात आली. या ठिकाणी नवीन, आधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे. जवळपास 2 वर्षांपूर्वी सदरची इमारत धोकादायक व मोडकळीस आल्याने तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाचे कामकाज पाचल ग्रामपंचायत इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात चालू होते.
राजापूर तालुक्यातील सुमारे १८ ग्राम महसूल कार्यालये व मंडळ अधिकारी कार्यालये निर्लेखित करण्याबाबतचे पत्र राजापूर तहसीलदार श्री. विकास गंबरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, राजापूर यांना दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी दिले होते. त्या पत्राच्या अनुषंगाने पाचल येथील कार्यालयाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
पाचल मंडळ अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पाचल, पेठवाडी, रायपाटण, परुळे आणि येळवण अशा पाच सजा असून त्यामध्ये एकूण १५ गावे समाविष्ट आहेत. नवीन इमारतीच्या नूतनीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग, राजापूर कार्यालयाकडून देण्यात आली आहे. नवीन इमारतीमध्ये पाचल तलाठी कार्यालय, पेठवाडी तलाठी कार्यालय आणि पाचल मंडळ अधिकारी कार्यालय अशी एकूण तीन स्वतंत्र कार्यालये उभारण्यात येणार असल्याचे महसूल विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
राजापूर तालुक्यात एकूण ६३ तलाठी कार्यालये आणि १० मंडळ अधिकारी कार्यालयांच्या इमारती बांधण्यात येणार असून त्यापैकी पाचल येथील कार्यालयाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या प्रयत्नांतून या इमारतीसाठी बजेटमधून मंजुरी मिळाली असून नुकतेच या इमारतीचे भूमिपूजन युवा नेत्या अपूर्वाताई सामंत यांच्या उपस्थितीत पार पडले होते.

