(रत्नागिरी / प्रतिनिधी)
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी खेड नगर परिषदेसाठी महायुतीकडून माधवी राजेश बुटाला यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. तर रत्नागिरी नगर परिषदेत दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने तेथील निवडणूक रंग घेऊ लागली आहे. मात्र, खेड वगळता जिल्ह्यातील इतर ठिकाणी अद्यापही राजकीय चर्चांना आणि बैठकींनाच उधाण आले असून उमेदवार निश्चितीचा ‘थ्रिल’ कायम आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांत चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, देवरुख, लांजा आणि गुहागर येथे अद्याप उमेदवारीवर तोडगा लागलेला नाही. विशेषतः चिपळूण आणि रत्नागिरी येथे उमेदवारीच्या प्रतीक्षेचा खेळ अजूनही सुरूच आहे. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्र. ३ मध्ये मतीन याकुबसतार बावानी आणि हीना मतीन बावानी या दाम्पत्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. या प्रभागातून प्रथमच अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीमधून उमेदवारी नेमकी कुणाला मिळणार, यावर अद्यापही संभ्रम कायम आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे काही इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्याची तयारी केल्याचीही चर्चा रंगली आहे.
रत्नागिरीतील प्रभाग क्र. २ हा शिवसेनेचे नेते राजन शेट्ये यांचा पारंपरिक प्रभावक्षेत्र मानला जातो. या प्रभागात शेट्येंचे दीर्घकाळ वर्चस्व राहिले आहे. याच प्रभागात बादानी दांपत्याने उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे या भागातील राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत आहेत. चिपळूण नगर परिषदेच्या उमेदवारीसाठी बुधवारी महायुतीची बैठक पार पडली. मात्र, उमेदवारी कुणाला द्यायची, यावर एकमत न झाल्याने परिस्थिती जैसे थेच राहिली. परिणामी, तिसऱ्या दिवशीही चिपळूण नगर परिषदेत एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. खेड नगर परिषदेसाठी मात्र बुधवारी महायुतीच्या माधवी राजेश बुटाला यांनी नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जामुळे खेडमधील राजकीय वातावरण चैतन्यमय झाले आहे.
इतर ठिकाणी राजकीय शांतता कायम
राजापूर, देवरुख, लांजा आणि गुहागर या ठिकाणी बुधवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. सर्वच इच्छुक उमेदवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत असल्याने या ठिकाणी राजकीय वातावरण शांत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आता काहीच दिवसांवर येऊन ठेपली असताना, प्रमुख पक्षांनी अजूनही अधिकृत उमेदवार निश्चित न केल्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. मात्र, खेड आणि रत्नागिरी येथे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीच्या स्पर्धेला सुरुवात झाली असून, पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

