(रत्नागिरी)
विश्वशांतीचे अग्रदूत आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर मैदान येथे सायंकाळी 6 वाजता भव्य “भक्ती उत्सव” संपन्न होणार आहे. या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मैदानावरील तयारीच्या कामाला गुरूपूजनाने विधिवत शुभारंभ करण्यात आला.
भक्ती, शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रसार करणारा हा उत्सव रत्नागिरीकरांसाठी एक विशेष पर्व ठरणार आहे. कार्यक्रमाच्या स्थळावर गुरूपूजन करून सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत आयोजनाच्या कामास सुरुवात केली. गुरूपूजनाच्या माध्यमातून कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा, तसेच समाजात शांतता, सौहार्द आणि अध्यात्मिक जाणीव वाढीस लागावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंग रत्नागिरी टीममधील भक्ती उत्सवाच्या संयोजिका आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचर ॲड. जया सामंत यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचर सोनिया, विनिता गोखले, भुवना महागावकर, नितीशा मोरे, अनघा देशपांडे, निलेश मिरजकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या उपस्थितीत होणारा हा भक्ती उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता, अध्यात्मिक उन्नती, सांस्कृतिक एकोपा आणि मानसिक शांतीचा संदेश देणारा ठरणार आहे. विविध भक्तिगीते, साधना आणि प्रेरणादायी क्षणांचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
रत्नागिरी शहरासाठी अभिमानास्पद ठरणाऱ्या या भक्ती उत्सवाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचार, प्रेम आणि विश्वशांतीचा संदेश पोहोचेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

