(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शालेय शिक्षण विभागाने गेल्या वर्षी घेतलेल्या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या कायमस्वरूपी थांबविण्यात आल्या आहेत. मात्र, जुन्या शिक्षकांसाठी ही प्रक्रिया सुरू ठेवली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. तथापि, चालू शैक्षणिक वर्षातील ऑगस्ट महिना उलटून गेला तरी शासनाकडून कोणतीही हालचाल न झाल्याने २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात आंतरजिल्हा बदल्या होणार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे.
२०२३ मध्ये शासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, नव्याने भरती होणाऱ्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची संधी मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, त्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी बदल्यांची प्रक्रिया सुरू ठेवली जाणार होती. यासाठी दरवर्षीप्रमाणे ऑनलाइन पोर्टलवर अर्ज भरण्याची सोय केली जाते. मात्र, यंदा अद्याप पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे इच्छुक शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
आंतरजिल्हा बदल्यांबाबत शासनाने एक अट घातली होती. त्यानुसार, बदल्या करण्यासाठी रिक्त पदांची टक्केवारी १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. मात्र, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात ही अट शिथिल करण्यात आली. परिणामी, २ हजारांहून अधिक पदे रिक्त असतानाही शिक्षकांना कार्यमुक्त करून बदल्या देण्यात आल्या. यामध्ये सन २०२३ मध्ये कार्यमुक्त झालेले शिक्षक ७०७ एवढी संख्या आहे. तर सन २०२४ मध्ये कार्यमुक्त झालेले ३५० शिक्षकांचा समावेश आहे.
नवीन शिक्षकांसाठी बदलीची दारे बंद
आगामी काळात नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदलीची संधी मिळणार नाही. सेवेत प्रवेश करतानाच त्यांनी ‘स्वगृह जिल्ह्यात बदलीची मागणी करणार नाही’ अशी लेखी हमी शासनाला द्यावी लागणार आहे. त्यामुळे नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंत त्यांना त्याच जिल्ह्यात सेवेत राहावे लागेल.
शिक्षकांमध्ये अस्वस्थता
जिल्ह्यातील हजारो शिक्षक स्वगृहात जाण्याचे स्वप्न पाहत होते. मात्र, बदल्यांची प्रक्रिया पूर्णपणे बंद झाल्याने शिक्षकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. रिक्त पदांचा प्रश्न गंभीर असतानाही शासनाने यंदा कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

