(रत्नागिरी /प्रतिनिधी)
सह्याद्रीच्या कुशीत वसलेला संगमेश्वर तालुका जैवविविधतेने समृद्ध मानला जातो. डोंगरदऱ्या, जंगल आणि ओढ्यांच्या परिसरात नैसर्गिकरित्या उगवणारी करवंदे, जांभळे, आंजने, काळी मैना तसेच अळूसारख्या खाद्य वनस्पती ही येथील रानमेव्याची ओळख आहे. मात्र, काळाच्या ओघात या नैसर्गिक संपत्तीचे महत्त्व कमी होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रक्रिया उद्योगांचा अभाव, बाजारपेठेची कमतरता आणि बदलती जीवनशैली यामुळे हा रानमेवा दुर्लक्षित राहत असून मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
एकेकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा हा रानमेवा आता जंगलापुरताच मर्यादित राहू लागला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत करवंदे, जांभळे आणि आंजने गोळा करून स्थानिक बाजारपेठेत विक्री केली जात असे. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळत होता. मात्र, आधुनिक बाजारपेठेतील स्पर्धा, ग्राहकांच्या बदललेल्या आवडी-निवडी आणि स्थानिक स्तरावर प्रक्रिया उद्योगांची कमतरता यामुळे या फळांची मागणी कमी होत गेली. विशेष म्हणजे, करवंदापासून जॅम, लोणचे, सरबत, स्क्वॅश तसेच जांभळापासून पावडर, सिरप आणि आरोग्यपूरक उत्पादने तयार करण्याची मोठी क्षमता असूनही त्यासाठी कोणतेही संघटित प्रयत्न होताना दिसत नाहीत. आंजने आणि काळी मैना यांसारख्या फळांनाही पौष्टिक मूल्य असून त्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार होऊ शकतात. तरीही या नैसर्गिक संपत्तीचा व्यावसायिक दृष्टीने वापर करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण, भांडवल आणि शासकीय पाठबळ उपलब्ध नसल्याने संभाव्य उद्योग उभे राहत नाहीत.
स्थानिक महिला बचत गटांनी पुढाकार घेतल्यास या रानमेव्यावर आधारित लघुउद्योग उभारता येऊ शकतात, असे मत कृषी व ग्रामीण विकास क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. प्रक्रिया उद्योगांमुळे ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच स्थानिक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळू शकते. यामुळे ग्रामीण अर्थचक्राला चालना मिळण्यास मदत होईल, असेही सांगितले जाते.
संगमेश्वर तालुक्यातील वनक्षेत्र आणि जैवविविधता ही निसर्गाची मोठी देणगी मानली जाते. मात्र, या नैसर्गिक संपत्तीचे जतन आणि आर्थिक मूल्यात रूपांतर करण्यासाठी शासनाच्या स्तरावर ठोस धोरण आखण्याची गरज व्यक्त होत आहे. वनउत्पादन प्रक्रिया केंद्रे, प्रशिक्षण शिबिरे, महिला बचत गटांना अनुदान आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास रानमेव्याला नवी ओळख मिळू शकते. निसर्गाने मुक्तहस्ते दिलेली ही संपत्ती योग्य नियोजनाअभावी दुर्लक्षित राहत असल्याने “निसर्गाचं दान, त्याला मिळेना मानाचं पान” अशीच भावना आता ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

