(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरालगतच्या खेडशी आणि फणसवळे परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच रात्रीत पाच बंद घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. या धाडसी घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ही घटना सोमवार, २१ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली. खेडशी येथील विश्वास दत्तात्रय देसाई यांच्या घरासह शेजारील आणखी तीन बंद घरे चोरट्यांनी फोडली. देसाई कुटुंब सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेले आहे. मंगळवारी सकाळी शेजाऱ्यांनी घराचे दरवाजे उघडे असल्याचे पाहून पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता अन्य तीन घरेही फोडल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, खेडशीजवळील फणसवळे येथेही भिकाजी माने यांचे बंद घर चोरट्यांनी लक्ष्य केले. माने कुटुंब सध्या मुंबईत वास्तव्यास असून, त्यांच्या अनुपस्थितीत घर फोडले गेले. ही बाबही शेजाऱ्यांच्या लक्षात येताच ग्रामीण पोलिसांना सूचित करण्यात आले.
पोलिसांनी दोन्ही ठिकाणी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. चोरट्यांनी सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चोरी गेलेल्या ऐवजाची नेमकी किंमत अद्याप स्पष्ट झालेली नाही.
अलीकडेच बनावट पोलिस बनून दोन महिलांचे दागिने लुटल्याची घटना ताजी असतानाच, आता पाच घरफोड्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलीस या घटना गांभीर्याने घेत असून, तपास सुरू आहे. चोरट्यांचा लवकरच पर्दाफाश होईल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.