(रत्नागिरी)
महाराष्ट्र एकमेव असे राज्य आहे ज्या राज्यात १० भाषांसाठी साहित्य अकादमी कार्यरत आहे. शासन स्तरावरून संस्कृत भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य संस्कृत अकादमी कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे भाषा हा विवादाचा नाही तर संवादाचा विषय आहे आणि हीच शासनाची भूमिका असल्याचे प्रतिपादन राज्य संस्कृत साहित्य अकादमीचे सहसंचालक तथा सदस्य सचिव सचिन निंबाळकर यांनी केले.
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र, रत्नागिरी उपकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान या एकदिवसीय चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संस्कृत व प्राकृत विभागातील प्रा. दिनेश रसाळ, चिपळुणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे प्रकाश देशपांडे, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये उपस्थित होत्या. सूत्रसंचालन स्वरूप काणे यांनी केले.
श्री. निंबाळकर म्हणाले की, येत्या काळात संस्कृत साहित्य अकादमीचे कार्य अधिक विस्तारित होणार आहे. अकादमीमार्फत संस्कृत भाषेतील लेखनाला प्रोत्साहन मिळावे आणि लेखकांना प्रेरणा मिळावी म्हणून पुरस्कार योजना राबवली जाणार आहे. त्याचप्रमाणे संस्कृत भाषेत विविध माहितीपूर्ण लेखनासाठी शासनाकडून अनुदान देखील दिले जाईल. त्याचबरोबर संस्कृतची महती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी संस्कृत साहित्याचा मराठीत अनुवाद करण्याला देखील अनुदान देणार असल्याची माहिती यावेळी राज्य संस्कृत साहित्य अकादमीचे सहसंचालक तथा सदस्य सचिव सचिन निंबाळकर यांनी दिली.
प्रास्ताविक संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केले. त्यांनी चर्चासत्राचा उद्देश आणि कोकणातील विद्वान परंपरा यावर भाष्य केले. प्रा. दिनेश रसाळ यांनी कोकणातील विद्वानांचे संस्कृत साहित्यातील योगदान या विषयाचा आढावा घेत विस्तृत मार्गदर्शन केले.
अकादमीचा पहिला कार्यक्रम रत्नागिरीत
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमीचा हा पहिलावहिला कार्यक्रम रत्नागिरीत झाला, ही आमच्यासाठी अत्यंत आनंददायी गोष्ट आहे. याचे श्रेय कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राला जाते. अकादमीचा प्रवास रत्नागिरीतून झाला आहे. दरवर्षी रत्नागिरीत देखील कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन सचिन निंबाळकर यांनी दिले.

