(संगमेश्वर / एजाज पटेल)
एकता रत्नागिरी जिल्हा टू-व्हीलर मेकॅनिक, तांत्रिक प्रशिक्षण व कौशल्य विकास असोसिएशन संलग्न संगमेश्वर तालुका टू-व्हीलर मेकॅनिक असोसिएशन यांच्या पुढाकाराने लोवले येथील शुभगंधा मंगल कार्यालयात बी.एस.६ टीव्हीएस ज्युपिटर तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या प्रशिक्षणासाठी भारतातील नामवंत प्रशिक्षक व “किंग ऑफ बी.एस.६ टेक्नॉलॉजी” म्हणून ओळखले जाणारे श्री. विनोद पटवा यांनी तब्बल सहा तास सखोल मार्गदर्शन केले. बी.एस.६ इंजिन प्रणाली, फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञान, सेन्सर सिस्टिम, स्कॅनिंग प्रक्रिया तसेच प्रत्यक्ष दुरुस्ती करताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाय यांची त्यांनी सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिली.
प्रशिक्षणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे टीव्हीएस ज्युपिटर बी.एस.६ वाहने प्रत्यक्ष प्रशिक्षणस्थळी उपलब्ध करून देण्यात आली होती. या वाहनांवर थेट प्रात्यक्षिक प्रशिक्षण देत मेकॅनिक बांधवांना स्वतः स्कॅनिंग, फॉल्ट फाइंडिंग आणि दुरुस्ती प्रक्रिया हाताळण्याची संधी मिळाली. त्यामुळे हे प्रशिक्षण अधिक व्यवहार्य आणि उपयुक्त ठरले.
या उपक्रमाला खेड, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, लांजा, साखरपा, देवरुख आणि संगमेश्वर येथील मोठ्या संख्येने मेकॅनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकता रत्नागिरी जिल्हा मेकॅनिक असोसिएशनचे अध्यक्ष फैयाज खतीब यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत असे प्रशिक्षण मेकॅनिक बांधवांसाठी अत्यावश्यक असल्याचे सांगत या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, प्रतिष्ठित व्यापारी बच्चू सैतवडेकर, जनक जागुष्टे आणि प्रमोद आदटराव उपस्थित होते. युयुत्सु आर्ते यांनी प्रशिक्षक विनोद पटवा यांच्या ज्ञान आणि अनुभवाची विशेष प्रशंसा केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंगेश मांडवकर, इरफान नेवरेकर, संदीप (बंटी) वडके, मिलिंद पवार आणि अमोल सरनाईक यांनी निमंत्रक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. उपस्थित मेकॅनिक सदस्यांसाठी चहा, बिस्कीट तसेच दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
या प्रशिक्षणामुळे कोकणातील मेकॅनिक बांधवांना आधुनिक बी.एस.६ तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष आणि सखोल माहिती मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

