( रत्नागिरी/संगमेश्वर प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे उभारण्यात येऊ घातलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेला राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्मारकाच्या कामातील विलंबाबाबत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत निधीची नव्हे, तर राजकीय इच्छाशक्तीचीच कमतरता आहे, असे स्पष्ट शब्दांत म्हटले.
कसबा येथे संभाजी महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक उभारावे, अशी मागणी गेली अनेक वर्षे स्थानिकांकडून सातत्याने होत आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ घोषणांचा पाऊस पडला असून कामाची ठोस सुरुवात झालेली नाही, याकडे सपकाळ यांनी लक्ष वेधले. पालकमंत्र्यांकडून वारंवार आश्वासने दिली जातात; परंतु त्या आश्वासनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. संपूर्ण महाराष्ट्र हे पाहत आहे, असे ते म्हणाले.
स्मारकाबाबत शासनाने दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी करताना त्यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या घोषणेचाही उल्लेख केला. भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली होती; मात्र आजही प्रत्यक्षात कामाची गती समाधानकारक नाही, असे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी या परिसराला भेटी दिल्या असल्या, तरी कसबा परिसरातील विकासकामांचा वेग अपेक्षेप्रमाणे नसल्याचे त्यांनी सांगितले.
VIDEO नक्की पाहा: महालक्ष्मी व नवलाई पावणाई पालख्यांची भक्तिमय भेट, परिसरात उत्साहाची लहर
स्मारक उभारणीमुळे या भागाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख मिळेलच, शिवाय पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठी चालना मिळू शकते, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला. स्मारक हा केवळ भावनिक विषय नसून स्थानिक अर्थकारणाला बळ देणारा प्रकल्प ठरू शकतो. मात्र शासनाची उदासीन भूमिका खेदजनक आहे, असा आरोप त्यांनी केला. या वेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष काशीनाथ वाझे, फैज पाटणकर, मुरलीधर बोरसुतकर, इलियाज मापारी, अशोक पवार यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे, अशी एकमुखी मागणी केली.

