(संगमेश्वर)
स्वतंत्र कोकण राज्य अभियान तर्फे सातत्यपूर्ण आणि जनहितकारी सामाजिक कार्याची दखल घेत पत्रकार संदेश सुरेश जिमन यांना ‘कोकण रत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि लोकाभिमुख भूमिका लक्षात घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.
अनेक वर्षांपासून संदेश जिमन हे संगमेश्वर रेल्वे स्थानकातील प्रवासी सुविधा, गाड्यांचे थांबे, स्वच्छता यांसारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नांसाठी सतत पाठपुरावा करीत आहेत. एखाद्या कामाचा पाठपुरावा सुरू केल्यानंतर ते तो प्रश्न मार्गी लागेपर्यंत झटत राहतात. ते ‘निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर’ फेसबुक ग्रूप तर्फे सातत्याने सक्रिय राहून जनहिताचं काम करीत आहेत.
विशेषतः नेत्रावती एक्सप्रेसचा संगमेश्वर येथे थांबा मिळवून देण्यात याबाबत पाठपुराव्याची महत्त्वपूर्ण भूमिका त्यांची राहिली आहे. या कार्यामुळेच त्यांना ‘संगमेश्वरचा रेल्वे मॅन’ म्हणून विशेष ओळख मिळाली आहे. मडगाव, जामनगर आणि पोरबंदर एक्सप्रेसना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मिळावा यासाठी त्यांनी जनआंदोलन, उपोषण, तसेच कोकण रेल्वे अधिकारी, खासदार, आमदार आणि रेल्वे मंत्र्यांशी सातत्यपूर्ण संपर्क साधत आहेत. याच लोकाभिमुख कार्याची प्रशंसा करून स्वतंत्र कोकण राज्य अभियानाने त्यांची ‘कोकण रत्न’ पुरस्कारासाठी निवड केली आहे.
सदर पुरस्कार शनिवार, दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ४.०० ते ६.०० या वेळेत मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदानाजवळ, मुंबई येथे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान केला जाणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार व संपादक श्री. सचिन कळझुनकर उपस्थित राहणार आहेत.

