( संगमेश्वर / प्रतिनिधी )
राजापूर तालुक्यातील पडवे येथील नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावी ते आठवी मधील ८० विद्यार्थ्यांनी आज व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला वर्ग आणि कलादालनाला भेट देऊन प्रशालेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कलाविषयक उपक्रमांची माहिती घेतली. कलादालनातील कलाकृती पाहून नवोदयचे विद्यार्थी भारावून गेले.
पडवे येथील नवोदय विद्यालय विविध शैक्षणिक उपक्रम राबवत असते. याचाच एक भाग म्हणून आज या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरच्या कला वर्ग आणि कलादालन उपक्रमाला भेट दिली. कला विभागातर्फे विद्यार्थ्यांना कला वर्गा समोर उभारण्यात आलेल्या पेन्सिलचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरतर्फे गत २५ वर्षे राबविल्या जाणाऱ्या कलासाधना या चित्रकला वार्षिक उपक्रमाची विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. याबरोबरच कलाविषयक विविध उपक्रम, दैनंदिन सराव, शुभेच्छा पत्रांची निर्मिती, डिजिटल कलाशिक्षण याबाबत सर्व विद्यार्थ्यांना सखोल माहिती देऊन अवगत करण्यात आले. प्रशालेने सुरू केलेल्या कला वर्ग आणि कलादालन उपक्रमाचा कलेची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना कसा लाभ झाला, याविषयी नवोदयच्या विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांसह माहिती देण्यात आली. हाताला उत्तम वळण येण्यासाठी विद्यार्थ्यांनी दैनंदिन सराव करावा असे आवाहन यावेळी कला विभागातर्फे या विद्यार्थ्यांना करण्यात आले.
पैसा फंड कलादालनात असणाऱ्या कलाकृती पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर तरळलेला आनंद यावेळी दिसून आला. उत्साही विद्यार्थ्यांनी विविध कलाकृतींसह पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध कलाविषयक उपक्रमांबाबत नवोदयच्या विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली आणि यातील काही उपक्रम आम्ही स्वतः घरी गेल्यानंतर करण्याचा प्रयत्न करू असे विद्यार्थ्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी प्रसिद्ध चित्रकार विष्णू परीट,जैतापूर हायस्कुलचे उपक्रमशील कलाशिक्षक कुणकवळेकर नवोदयचे विद्यालयचे कलाशिक्षक उन्मेष वेलिंगकर, क्रीडा शिक्षक साहिल यादव, सहाशिक्षिका श्रीयांका बोर्डीकर, आदिती वाघधरे हे उपस्थित होते. व्यापारी पैसा फंड संस्थेतर्फे सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर यांनी नवोदय विद्यलयचे सर्व शिक्षक आणि प्राचार्य एस. बस्वराज यांना पैसा फंड कलादालनाला भेट दिल्या बद्दल धन्यवाद देण्यात आले. यावेळी चित्रकार विष्णू परीट यांच्या निसर्ग चित्राचे प्रात्यक्षिक संगमेश्वर येथील जाखमाता मंदीर परिसरात आयोजित करण्यात आले होते.

