( संगमेश्वर / प्रतिनिधी )
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून नुकतेच कोकणभूमी कृषि पर्यटन सहकारी संस्था कोकण प्रांततर्फे आयोजित कृषि पर्यटन प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. राई कृषि पर्यटन केंद्र गोळवली येथे हा दिवसभराचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थीना नवीन कृषि पर्यटन केंद्र उभारणी संबंधित मार्गदर्शन करण्यात आले.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मीनल ओक यांनी कृषि पर्यटन संकल्पना अधोरेखित करून कोकणभूमी कृषि पर्यटन सहकारी संस्थेची माहिती उपस्थिताना दिली. पर्यटन तज्ज्ञ व उद्योजक अण्णा महाजन यांनी कृषि पर्यटनामध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या फळ प्रक्रिया उद्योग याबाबत मार्गदर्शन केले व त्यांनी तयार केलेला आणि राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळालेला चलाख
झेला (फळं काढण्यासाठी उपयोगात येणारा) बाबत माहिती दिली. संस्था उपाध्यक्ष प्रमोद केळकर यांनी ग्रामीण पर्यटन, केळकरवाडी पर्यटन केंद्र सोयी सुविधा कशा पद्धतीने उभारण्यात आल्या, कृषि पर्यटन संलग्न इतर पर्यटन प्रकार व सुविधा याबाबत अनुभव कथन करून मार्गदर्शन केले.
संस्थेचे सचिव व कृषि पर्यटन केंद्र संचालक अमोल लोध यांनी कृषि पर्यटनाची गरज का हे सांगून पर्यटन केंद्र स्थापनेपासून पर्यटक आपल्या केंद्रातून बाहेर पडेपर्यंत सर्व टप्प्यांचा आढावा घेऊन त्या संबंधित आवश्यक असणाऱ्या गोष्टींबद्दल व आदरातिथ्याचे महत्व बाबत अतिशय उत्तमरीतीने माहिती दिली. तसेच निसर्ग पर्यटन जैवविविधता याचे महत्त्वही अधोरेखित केले. ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मकरंद केसरकर यांनी कृषि पर्यटनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, कृषि पर्यटनासाठी केल्या जाणाऱ्या बांधकाम पद्धती, कृषि व पर्यटन संबंधित विविध योजना यांची माहिती दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष निर्यातदार दीपक परब, सदस्य रामानंद लीमये यांनी आपले अनुभव कथन केले. प्रशिक्षणादरम्यान शिबीर समारोपाच्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षण कार्यशाळेबद्दल व मार्गदर्शनाबद्दल अतिशय सुंदर आणि उपयुक्त माहिती मिळाल्याबद्दल प्रातिनिधिक ऋण व्यक्त केले. रत्नागिरी जिल्ह्यातील नंदू साडविलकर यांनीही आपले पर्यटना संबंधितले अनुभव कथन केले. सर्वात शेवटी सचिव अमोल लोध यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून समारोप केला.

