(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर एसटी बस स्थानकातील प्रवाशांच्या सोयीसाठी बसविण्यात आलेला डिजिटल माहिती फलक अखेर कार्यान्वित करण्यात आला असला, तरी त्यावरील वेळापत्रकातील तांत्रिक त्रुटींमुळे प्रवाशांचा गोंधळ कायम असल्याचे चित्र समोर आले आहे. फलकावर अद्ययावत आणि अचूक माहितीऐवजी अनेक तासांपूर्वी निघून गेलेल्या बसची वेळ झळकत असल्याने या डिजिटल यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
यापूर्वी या डिजिटल फलकावर दिवसभर मोठ्या आवाजात केवळ जाहिराती दाखवल्या जात होत्या. मात्र, प्रवाशांसाठी अत्यावश्यक असलेली बसची वेळ, आगमन-विगमनाची माहिती किंवा बसच्या स्थितीविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. याबाबत संगमेश्वर तालुका भाजपचे उपाध्यक्ष मिथुन निकम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, हा फलक प्रवाशांच्या सोयीसाठी आहे की जाहिरातींसाठी, असा सवाल उपस्थित केला होता. त्यांनी तातडीने बसचे वेळापत्रक सुरू करण्याची मागणी करत, अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला होता.
या विषयावरील वृत्त मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर एसटी प्रशासनाने काही तासांतच डिजिटल फलकावर बसचे वेळापत्रक दाखविण्यास सुरुवात केली. मात्र, फलक सुरू झाला असला तरी त्यावरील माहिती अद्ययावत नसल्याने प्रवाशांना अपेक्षित सुविधा मिळालेली नाही.
अद्ययावत माहितीचा अभाव
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, फलकावर अनेकदा दोन ते तीन तासांपूर्वी निघून गेलेल्या बसची वेळच दिसत राहते. सध्याची वेळ, बसचे प्रत्यक्ष आगमन किंवा विलंबाची माहिती नियमितपणे अद्ययावत होत नसल्याने डिजिटल फलकाचा उद्देशच अपूर्ण राहिल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी अचूक वेळापत्रक अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, चुकीची किंवा कालबाह्य माहिती प्रदर्शित होत असल्याने अनेकांना आजही बस चौकशी कक्षावर अवलंबून राहावे लागत आहे.
मिथुन निकम यांची प्रशासनावर टीका
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना भाजपचे तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम म्हणाले, “प्रशासनाने केवळ टीका टाळण्यासाठी डिजिटल फलक सुरू केला आहे. मात्र, त्यावर अचूक आणि अद्ययावत माहिती न देता जुन्याच बसच्या वेळा दाखवल्या जात आहेत. हा प्रवाशांची दिशाभूल करणारा प्रकार असून, केवळ दिखाऊपणासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून उपयोग नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, डिजिटल फलकावरील जाहिरातींचा मोठा आवाज कमी करून बसचे रिअल-टाइम वेळापत्रक, बसचे आगमन, विलंब अथवा रद्द झाल्याची माहिती नियमितपणे अद्ययावत करावी. अन्यथा या प्रश्नावर प्रवाशांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच, स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणाची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
डिजिटल माहिती फलक हा प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी आणि बसविषयक अचूक माहिती एका नजरेत उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आला आहे. मात्र, ही यंत्रणा नियमितपणे अद्ययावत ठेवली गेली तरच त्याचा अपेक्षित लाभ प्रवाशांना मिळू शकतो. त्यामुळे केवळ फलक सुरू करणे नव्हे, तर त्यावरील माहितीही तितकीच अचूक आणि वेळोवेळी अद्ययावत ठेवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

