(रत्नागिरी / प्रतिनिधी)
नागरिककेंद्रित पोलीसिंग, पारदर्शकता आणि सार्वजनिक सुरक्षेला बळ देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये ‘मिशन परिपूर्ती’ हा महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. मा. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या लोकाभिमुख मिशनमुळे डायल ११२ वर संपर्क साधणाऱ्या प्रत्येक नागरिकाला प्रत्यक्षात योग्य व आवश्यक पोलीस मदत मिळाली आहे की नाही, याची थेट खात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत आहे.
डायल ११२ या आपत्कालीन सेवेवर नागरिकांकडून येणारे कॉल प्रथम केंद्रीय प्रणालीमार्फत रत्नागिरी येथील पोलीस नियंत्रण कक्षात प्राप्त होतात. तेथून संबंधित पोलीस ठाण्याला माहिती पाठविली जाते आणि पोलीस अधिकारी किंवा अंमलदार तात्काळ कॉलरपर्यंत पोहोचून मदत करतात. मात्र, या मदतीनंतर नागरिकांची समस्या पूर्णतः सुटली की नाही, याची वरिष्ठ पातळीवर थेट माहिती मिळत नव्हती. हीच बाब लक्षात घेऊन ‘मिशन परिपूर्ती’ या विशेष उपक्रमाची सुरुवात २९ ऑगस्ट २०२५ रोजी करण्यात आली.
या मिशनअंतर्गत ‘मिशन परिपूर्ती सेल’ची स्थापना करण्यात आली असून, हा सेल पोलीस नियंत्रण कक्ष, रत्नागिरी येथे कार्यरत आहे. डायल ११२ वर कॉल झाल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी कॉलरपर्यंत पोहोचल्यानंतर काही वेळाने, ‘मिशन परिपूर्ती’ सेलमार्फत त्या नागरिकाशी थेट संपर्क साधला जातो. त्यावेळी “आपली समस्या सुटली का?”, “आपल्याला योग्य व आवश्यक पोलीस मदत मिळाली का?”, “पोलीसांची वागणूक समाधानकारक होती का?” अशा प्रश्नांद्वारे सविस्तर अभिप्राय घेतला जातो. हा अभिप्राय स्वतंत्र रजिस्टरमध्ये नोंदविला जातो.
या नोंदींचे दररोज अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि स्वतः पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे नियमित मॉनिटरिंग करतात. एखाद्या प्रकरणात अडचण किंवा अपूर्णता आढळल्यास, पुन्हा ‘मिशन परिपूर्ती’ सेलमार्फत त्या कॉलरशी संपर्क साधून त्यांची समस्या पूर्णतः सोडवली जाते.
या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत २,७८२ कॉलर्सचा अभिप्राय घेण्यात आला असून, त्यापैकी १०० टक्के प्रकरणांमध्ये समस्यांचे यशस्वी निराकरण करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. नागरिकांचा विश्वास वाढविण्यासोबतच पोलीस सेवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी हा उपक्रम अत्यंत प्रभावी ठरत आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत अथवा पोलीस मदतीसाठी डायल ११२ या सेवेचा निःसंकोच वापर करावा. डायल ११२ वर कॉल केल्यानंतर ‘मिशन परिपूर्ती’ सेलचे अधिकारी अथवा अंमलदार आपल्याशी नक्कीच संपर्क साधतील. त्या वेळी नागरिकांनी आपल्या समस्या व अभिप्राय स्पष्टपणे मांडावेत, जेणेकरून पोलीस सेवा अधिक सक्षम, संवेदनशील आणि परिणामकारक करता येईल. तसेच, ‘मिशन परिपूर्ती’ उपक्रमात कोणतीही अडचण अथवा त्रुटी आढळल्यास ती थेट पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

