(दापोली / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी दापोली दौऱ्यादरम्यान दापोली पोलीस ठाण्याचा वार्षिक निरीक्षण आढावा घेतला. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील विविध विभागांची सखोल पाहणी करून दाखल गुन्ह्यांची सद्यस्थिती, प्रलंबित तपास प्रकरणे, मुद्देमाल निर्गती तसेच प्रतिबंधात्मक कारवायांचा तपशीलवार आढावा घेतला. पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या कामकाजाचेही त्यांनी बारकाईने मूल्यमापन केले.
निरीक्षणादरम्यान पोलीस अधीक्षक बगाटे यांनी उपस्थित अधिकारी व अंमलदारांना मार्गदर्शन करताना पोलीस दलातील शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. नागरिकांच्या तक्रारींकडे तत्परतेने लक्ष देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. वाढत्या सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचे आदेश देत अमली पदार्थांची खरेदी-विक्री व सेवन याविरोधात ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत कडक मोहीम राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
दापोली हे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष दक्षता घेण्याचे आदेश पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यात आले. याचवेळी पोलीस अंमलदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. नव्याने उभारण्यात येत असलेल्या पोलीस वसाहतींच्या बांधकामस्थळांचीही त्यांनी पाहणी केली.
या वार्षिक निरीक्षण तपासणीच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक बगाटे यांनी दापोली तालुक्यातील पोलीस पाटील व नागरिकांची संयुक्त बैठक घेतली. कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, महिलांची व नागरिकांची सुरक्षितता, सायबर गुन्ह्यांपासून बचाव तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित वापर या विषयांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन करून जनजागृती केली. कोणतीही संशयास्पद घटना किंवा व्यक्ती आढळल्यास तात्काळ ‘डायल ११२’ वर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीदरम्यान नागरिकांनी मांडलेल्या सूचना, तक्रारी व समस्यांचे समाधान करण्यात आले. या वेळी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश सणस, दापोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश तोरस्कर, पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

