(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर–रत्नागिरी ही सकाळी सहा वाजता सुटणारी महत्त्वाची एसटी फेरी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक बंद करण्यात आल्याने प्रवासी जनतेसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल झाले होते. ही गाडी संगमेश्वर तालुक्यातील अंदाजे पंधरा ते वीस गावांतील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची मानली जाते. रत्नागिरीतील माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची ही अत्यावश्यक जीवनरेखा असून या बसला नेहमीच मोठे प्रवासी भारमान मिळत असे.
मात्र, एसटी प्रशासनाने कोणताही अधिकृत आदेश, सूचना फलक किंवा स्टँडवरील घोषणा न करता ही फेरी बंद केल्याने रोज सकाळी
पाच वाजता घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले. अनेक विद्यार्थी वेळेत कॉलेजला व अन्य व्यवसायिक शिक्षनाच्या ठिकाणी पोहचू न शकल्याने वर्गातील तास चुकू लागले होते. या गैरसोयीची गंभीर दखल घेत काही विद्यार्थ्यांनी संगमेश्वर वाहतूक नियंत्रण कक्षात धाव घेत तक्रार वहीत औपचारिक तक्रार नोंदवली. एसटी बंद केल्यामुळे त्यांचे नियमित शैक्षणिक नुकसान होत असल्याचे त्यांनी तक्रारीत स्पष्ट नमूद केले. त्याचबरोबर “रत्नागिरी 24” समाज माध्यमाकडे त्यांनी आपली कैफियत मांडली.
विद्यार्थ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेत “रत्नागिरी 24” समाजमाध्यमाने तातडीने हा विषय लावून धरत बातमी प्रसिद्ध केली. ही बातमी प्रसारित होताच एसटी प्रशासन जागे झाले आणि कोणतीही विलंब न करता सहा वाजताची संगमेश्वर–रत्नागिरी ही महत्त्वाची फेरी पुन्हा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला.
एसटी फेरी सुरू झाल्याने प्रवासी जनतेसह विद्यार्थ्यांचा मोठा दिलासा झाला आहे. विद्यार्थ्यांनी “रत्नागिरी 24” समाजमाध्यमचे मनःपूर्वक आभार मानत, आम्हाला योग्य न्याय मिळवून दिला अशी भावना व्यक्त केली.

