(संगमेश्वर / एजाज पटेल)
डिंगणी खाडेवाडी येथील एसटी थांब्यावरील निवारा शेड २०१७ मध्ये पाडण्यात आल्यानंतर तब्बल आठ वर्षे उलटूनही नवीन शेड उभारण्यात आलेली नसल्याने प्रवाशांना उन्हा-पावसात उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, तातडीने निवारा शेड उभारण्याची मागणी जोर धरत आहे.
शास्त्री पूल-आंबेड-डिंगणी या मुख्य मार्गावरील डिंगणी खाडेवाडी हा एसटी थांबा परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचा दुवा मानला जातो. २००३ मध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी येथे निवारा शेड उभारण्यात आली होती. मात्र, २०१७ मध्ये ती जीर्ण झाल्याचे कारण देत प्रशासनाने शेड पाडली. त्यानंतर नवीन शेड उभारण्याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
डिंगणी खाडेवाडी हा थांबा केवळ स्थानिकांसाठीच नव्हे, तर खाडीपलीकडील परचुरी, कडेवाठारसह परिसरातील अनेक गावांतील नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. दररोज विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि नोकरदार या ठिकाणाहून एसटी व इतर वाहनांची प्रतीक्षा करतात.
सध्या या ठिकाणी प्रवाशांना उन्हापासून किंवा पावसापासून संरक्षण मिळावे, अशी कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे उन्हाळ्यात कडक उन्हात तर पावसाळ्यात मुसळधार पावसात आणि चिखलात उभे राहून प्रवास करावा लागत असल्याने विशेषतः विद्यार्थी, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
याबाबत स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. जनतेच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, लवकरात लवकर सुसज्ज निवारा शेड उभारण्यात यावी, अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

