(संगमेश्वर / एजाज पटेल)
आजच्या स्वार्थ, ढोंगीपणा आणि फसवणुकीच्या काळातही प्रामाणिकपणा जिवंत आहे, हे संगमेश्वर तालुक्यात घडलेल्या एका घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. धामणी (पवारवाडी) येथील निकिता निलेश पवार यांचा किमती मोबाईल फोन संगमेश्वर परिसरात हरवला होता. मोबाईल हरवल्याने त्यांची मोठी धावपळ सुरू होती आणि चिंता वाढली होती.
बुधवारी संगमेश्वरचा आठवडी बाजार असल्याने परिसरात मोठी गर्दी होती. बाजारासाठी आलेल्या नागरिकांमुळे रस्ते वाहनवर्दळीने आणि रहाटीने गजबजले होते. अशा परिस्थितीत हरवलेला मोबाईल सापडेल, अशी अपेक्षा कमीच होती. मात्र संगमेश्वर (निढलेवाडी) येथील प्रदीप वाडकर आणि वीरेंद्र सुतार या दोन सज्जन नागरिकांना तो मोबाईल सापडला.
मोबाईल सापडल्यानंतर तो स्वतःकडे ठेवण्याचा विचार न करता त्यांनी मालकाचा शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मोबाईल लॉक असल्याने कोणताही संपर्क क्रमांक मिळू शकला नाही. त्यामुळे कोणताही गैरवापर न करता तो मोबाईल पोलीस ठाण्यात जमा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
दरम्यान, निकिता पवार यांनी दुसऱ्या मोबाईलवरून आपल्या हरवलेल्या मोबाईलवर कॉल केला. हा कॉल वीरेंद्र सुतार यांनी स्वीकारला. कॉलवरून संपूर्ण माहिती समजल्यानंतर त्यांनी मोबाईल सुरक्षित असल्याची खात्री दिली. आवश्यक ओळख पटवून मोबाईल अत्यंत इमानेइतबारे आणि सुरक्षितपणे निकिता पवार यांच्याकडे परत करण्यात आला.
मोबाईल परत मिळाल्यानंतर निकिता पवार यांचा आनंद आणि समाधान शब्दांत व्यक्त करता येण्यासारखे नव्हते. आजच्या काळात असा प्रामाणिकपणा दुर्मिळ होत असताना, प्रदीप वाडकर आणि वीरेंद्र सुतार यांनी माणुसकी, नैतिकता आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
या घटनेमुळे संगमेश्वरात त्यांचे कौतुक व अभिनंदन होत असून, “अजूनही समाजात चांगली माणसं आहेत” हा विश्वास त्यांनी आपल्या कृतीतून दृढ केला आहे. त्यांचे हे कृत्य तरुण पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.

