( संगमेश्वर )
दिनांक 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त चक्रभेदी सोशल फाउंडेशन तसेच उत्कर्ष बहु विकलांग पुनर्वसन संस्था देवरूख यांच्या वतीने विविध व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.. या कार्यक्रमानिमित्त विविध गावातून दिव्यांग व्यक्ती आले होते. सामाजिक कार्यकर्ते आर्ते यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये अपंगांचे विविध प्रश्न मांडले. पंचायत समिती देवरुखचे सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी दिव्यांग कॅम्प आपण लवकरच लावण्याचा प्रयत्न करू असे सांगितले, तसेच दिव्यांगाना कोणतीही मदत लागली तर आम्ही नेहमी तत्पर आहोत असे सांगितले.
भारतीय उद्योजकता विकास संस्थचे प्रकल्प अधिकारी दत्तात्रय परुळेकर यांनी त्यांच्याकडे घेत असलेल्या प्रशिक्षणांविषयी माहिती दिली. त्यानंतर सदर संस्थेचे मुख्य अधिकारी मिलिंद दातार यांनी अनेक उद्योगधंद्यांविषयीची माहिती देऊन आपण टाकाऊतून टिकाऊ कशा पद्धतीने उद्योगधंदे करू शकतो याची उत्तम प्रकारे माहिती दिली. तर जनशिक्षण संस्थान रत्नागिरीचे संतोष घडशी यांनी अनेक प्रकारच्या प्रशिक्षणाची माहिती दिली. त्यानंतर चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या वैदेही सावंत यांनी उपस्थित सर्व दिव्यांग व्यक्तींना आपण एकत्रित येऊन विचार मंथन केलं पाहिजे, आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे असे सांगितले. तसेच त्यांनी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. कोणत्याही निमित्ताने आपण जेव्हा एकत्र येतो त्या वेळेला विचार मंथन होणं अत्यंत गरजेच आहे हे पटवून सांगितले. उत्कर्ष बहूविकलांग पुनर्वसन संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप बळीराम सावंत भोसले तसेच अध्यक्ष विलास कदम यांनी सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.