(संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव साखरपाचे सर्वमान्य थोर समाजसेवक यांच्या स्मृतीप्रित्यर्थी प्रातिवर्षी कै. नानासाहेब शेट्ये स्मृती व्यक्ती व संस्था पुरस्कार दिले जातात. वर्तमानपत्र व सोशल मिडियाच्या माध्यमातून मर्ज मागविले जातात व मिवड समितीमार्फत योग्य व्यक्ती व संस्था यांची निवड केली जाते.यावर्षी व्यक्ती पुरस्कारासाठी चेतन नाईक यांची तर संस्था पुरस्कारासाठी घाटीवळे मराठा महासंघ, मुंबई यांची निवड करण्यात आली आहे.
यावर्षी अनेक अर्ज प्राप्त झाले होते . निवड समिती सदस्यांनी एकमताने स्मृती पुरस्कार २०२५ ची निवड केली आहे. यावर्षीच्या प्राप्त अर्जामधून कै. नानासाहेब शेट्ये स्मृती व्यक्ती पुरस्कारासाठी मु.पो. वांझोळे (कुड्याचा माळवाडी ) येथील तरुण पर्यावरण व निसर्गरक्षक व ज्यांची ‘नारळमित्र’ म्हणून सर्वदूर ख्याती पसरली आहे, असे शाश्वतशेती पदवीधारक चेतन लक्ष्मण नाईक यांची निवड करण्यात आली आहे. तसेच संस्था पुरस्कारासाठी घाटिवळे ( पश्चिम विभाग) मराठा संघ, मुंबई या संस्थेची निवड करण्यात आली आहे. ही संस्था गेली ३० वर्षे सातत्यपूर्ण रीतिने विविध उपक्रम राबवून आपल्या जन्मभूमी व समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहे. घाटीवळे परिसरातील शाळांमध्ये भौतिक – शैक्षणिक सुविधा, विद्यार्थी गुणगौरव, विशेष गौरव प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान , विशेष व्यक्ती सन्मान, सर्वांमध्ये स्नेहभाव वृद्धींगत व्हावा यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन या माध्यमांतून सामाजिक बांधिलकी जपत आहे.
यावर्षीच्या पुरस्कार प्राप्त व्यक्ती व संस्था यांचे संस्थेचे अध्यक्ष संदेश ऊर्फ बापूसाहेब शेट्ये, सरचिटणीस संतोष केसरकर, ग्रामीण समितीचे अध्यक्ष दत्ताराम शिंदे, कार्याध्यक्ष गणपत शिर्के, चिटणीस रमाकांत शिंदे, खजीनदार मारुती शिंदे, रमाकांत शेट्ये यांनी भाभिनंदन केले आहे. या पुरस्कारांचे वितरण कै. नानांच्या स्मृतीदिनी १ ऑगस्ट २०२५ रोजी ‘नाना शेट्ये सभागृह, साखरपा येथे मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

