(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, चाफवली नं. 1 येथील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु. स्वरांगी परेश कांबळे हिची इस्रो भेटीसाठी निवड झाली आहे. या यशामुळे चाफवली नं. 1 शाळेने इस्रो/नासा निवड चाचणीत सलग तिसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांची निवड होत हॅट्ट्रिक साधली असून, ही शाळेसाठी अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.
जिल्हा परिषद, रत्नागिरी प्राथमिक शिक्षण विभागामार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इस्रो/नासा निवड चाचणी परीक्षेत चाफवली शाळेने सातत्यपूर्ण यश मिळवले आहे. पहिल्या वर्षी कु. नितीन बोडेकर, दुसऱ्या वर्षी कु. समीक्षा बोडेकर आणि यावर्षी कु. स्वरांगी परेश कांबळे यांची निवड होत शाळेने सलग तीन वर्षांची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.
सन 2025-26 या वर्षातील निवड प्रक्रियेत कु. स्वरांगी हिने केंद्रस्तर, तालुकास्तर आणि जिल्हास्तर या तिन्ही स्तरांवर गुणवत्ता यादीत स्थान मिळवत इस्रो भेटीसाठी पात्रता सिद्ध केली. तिच्या या दैदीप्यमान यशाबद्दल शिक्षण विभाग, शिक्षक, ग्रामस्थ आणि पालक वर्गातून सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री. गजानन मोघे, वर्गशिक्षिका व मार्गदर्शिका सौ. संगीता मगदूम, शिक्षण सेविका सौ. नीलम सोलापूरे व सौ. वर्षाराणी कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रयोग व मुलाखत तयारीसाठी देवळे हायस्कूलचे मार्गदर्शक शिक्षक श्री. विनोद सरदेसाई यांनी विशेष सहकार्य केले. देवळे हायस्कूलचे अध्यक्ष श्री. निलेश कोळवणकर, मुख्याध्यापिका सौ. सुप्रिया गार्डी व शिक्षकवृंद यांनीही आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले.
कु. स्वरांगीच्या या यशाबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी श्री. अण्णासाहेब बळवंतराव, केंद्रप्रमुख श्री. संतोष बोडेकर, माजी जि. प. सभापती श्री. विलास चाळके, चाफवलीच्या सरपंच सौ. आरोही रावण, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक, माजी मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले. देवळे केंद्रातील शिक्षकवृंदांनीही कु. स्वरांगी व चाफवली नं. 1 शाळेच्या शिक्षकांचे विशेष कौतुक केले आहे.
ही कामगिरी ग्रामीण भागातील शाळांसाठी प्रेरणादायी ठरत असून चाफवली नं. 1 शाळेने शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे.

