( संगमेश्वर / प्रतिनिधी )
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना पोषण आहाराच्या धान्याचा पुरवठा करणारा संगमेश्वर तालुक्यातील सांगवे केंद्राचा पुरवठादार मनमानीपणा करत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे असून सायंकाळी शाळा सुटल्यानंतर त्यांना पोषण आहार उतरून घेण्यासाठी थांबवून ठेवत असल्याबद्दल शिक्षक वर्गांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पोषण आहार पुरवठादाराला संबंधितांनी योग्य त्या सूचना न दिल्यास संघटना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे सांगण्यात आले.
संगमेश्वर तालुक्याच्या सांगवे केंद्रात आज (शुक्रवार) सकाळपासून पोषण आहाराचे धान्य पुरवठा करणारा पुरवठादार ठिकठिकाणीच्या शाळेत पोषण आहार देत असताना सर्व शाळा एकाच दिवसात पूर्ण करण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी यायला लागू नये म्हणून, सांगवे केंद्रातील अनेक शाळा मधील शिक्षकांना पोषण आहार पुरवठा करणाऱ्या वाहन चालकाने सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर दोन तासांपेक्षा अधिक काळ थांबून ठेवले होते.
संबंधित शिक्षकांना पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने आपण पोषण आहार उतरून घेण्यासाठी थांबला नाहीत तर, तुम्हाला पोषण आहाराचे धान्य रत्नागिरीत येऊन घेऊन जावं लागेल असे सांगितले. यापूर्वीही शाळा सुटल्यानंतर अनेक वेळा पोषण आहाराचा पुरवठा उशिरा करण्यात आला होता. आज मात्र रात्री आठ वाजेपर्यंत महिला शिक्षकांना थांबवून पुरवठादाराने कहरच केला.
सांगवे केंद्रातील करंबेळे शेवरवाडी या शाळेत आज शुक्रवारी रात्रीचे सात वाजले तरीही पोषण आहार पुरवठा करणारी गाडी आली नव्हती. या शाळेत महिला शिक्षिका कार्यरत आहेत. सातनंतर आलेला पोषण आहार उतरून घ्यायचा कधी आणि शिक्षकांनी घरी जायचे कधी ? असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने यानंतर आपल्या कारभारात सुधारणा केली नाही तर, प्रसंगी त्यांच्या या वर्तनाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली जाणार असल्याचे सांगितले. रात्रीच्या वेळी पोषण आहार उतरून घेत असताना महिला शिक्षिकेला जर कोणता धोका पोहोचला ? तर याला जबाबदार कोण असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
पुरवठा विभागाने संगमेश्वर तालुक्यातील सांगवे केंद्रात पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला सक्त सूचना द्याव्यात अन्यथा पुढील वेळेस पाच नंतर आलेला पोषण आहार उतरवून घेतला जाणार नाही असे ठणकावून सांगण्यात आले आहे.

