(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
नावडी एस.टी. स्टँडसमोर गणेशोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने उभारलेल्या नागरी सुविधा केंद्रात गणेशभक्तांच्या सेवेत तत्पर असलेल्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संगमेश्वरातील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक श्री. जाधव, ट्रॅफिक पोलीस अधिकारी रामपुरे, कुर्बान खतीब, आव्हाड, रियाज मुजावर, महसूल व आरोग्य विभागाचे कर्मचारी, तलाठी, कृषी विभागातील अधिकारी तसेच होमगार्ड आदींना ज्येष्ठ नागरिक जनार्दन शिरगावकर, प्रमोद शेट्ये, राजेंद्र बिर्जे, माजी सरपंच नम्रता शेट्ये, नितीन शेट्ये, चंद्रकांत गावडे (तेरे) यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला.
प्रमोद शेट्ये यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना गणेशभक्तांच्या सेवेसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा व्यक्त केली.
दरम्यान, अमृता ग्रुप व सुरक्षा समितीच्या सदस्या सौ. अर्चिता राहुल कोकाटे, डॉ. जोग मॅडम व नसरीन मोडक मॅडम यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन परिसरातील शांतता व सुव्यवस्था राखणाऱ्या महिला पोलीस व होमगार्ड यांचा सन्मान केला. महिला पोलीस तांबडे मॅडम, वर्षाराणी कोष्टी, योगिता बरगाळे, क्रांती सावंत, सहाय्यक पोलीस अधिकारी तसेच महिला होमगार्ड कामिनी पडवळ यांना गुलाबपुष्प अर्पण करून त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली.

