(चिपळूण / वार्ताहर)
शिक्षण क्षेत्रात तब्बल ३७ वर्षे निस्वार्थपणे ज्ञानदानाची सेवा बजावणाऱ्या, कार्यकुशल, सेवाभावी आणि उपक्रमशील शिक्षिका समीरा शौकत कारविणकर या सेवानिवृत्त झाल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेणाऱ्या आदर्श शिक्षिकेच्या सेवानिवृत्तीप्रसंगी त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
समीरा कारविणकर यांनी आपली संपूर्ण शैक्षणिक सेवा चिपळूण तालुक्यात बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये उत्तम संस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीव रुजविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमास आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला चिपळूणच्या नगरसेविका नसरीन खडस, ज्येष्ठ शिक्षिका सफिया मोगल, समाजसेवक एजाज इब्जी, रिझवाना इब्जी, अन्वर कुरवले, रेहाना वलेले, शरफत वलेले, सलीम गडकरी, बशीर अलवारे, मुश्ताक अष्टीकर, इक्बाल दळवी, निलम दळवी, नुरजहाँ खलफे, राहीन नेवरेकर, नाईला खडस यांच्यासह अनेक शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी समीरा कारविणकर यांच्या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी सेवाकार्याचा गौरव करत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शौकत कारविणकर आणि समीरा कारविणकर या दाम्पत्यालाही उपस्थितांनी निरोगी, आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

