(चिपळूण)
चिपळूण शहरात बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. धुळे जिल्ह्यातील मूळचे आणि सध्या पाग येथे वास्तव्यास असलेले निलेश रामदास अहिरे (वय २६) व पत्नी अश्विनी निलेश अहिरे (वय १९) या नवविवाहित दांपत्याने वाशिष्ठी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. गांधारेश्वर मंदिराशेजारील पुलावरून त्यांनी घेतलेली ही उडी प्रत्यक्षदर्शींनी पाहिली, तर अश्विनी पाण्यात बुडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली.
उपलब्ध माहितीनुसार, बुधवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास हे दांपत्य मोटारसायकलवरून गांधारेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर रेल्वे स्टेशनकडे जाताना दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर ते माघारी फिरले आणि थेट गांधारेश्वर पुलावर आले. तेथे वाद विकोपाला गेल्यानंतर अश्विनीने रागाच्या भरात वाशिष्ठी नदीच्या पात्रात उडी घेतली. तिच्या मागोमाग पती निलेशनेही उडी मारली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचे समजते. मात्र नेमक्या कोणत्या कारणावरून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. याबाबत पोलिस तपास सुरू आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रत्यक्षदर्शींनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली, परंतु तोपर्यंत क्षणाच्या कालावधीतच दोघेही पाण्यात बुडून दिसेनासे झाले होते. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक घटनास्थळी दाखल झाले. संध्याकाळ उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती, मात्र काल उशीरपर्यंत दांपत्याचा शोध लागला नव्हता. संध्याकाळी दिसेनासे झाल्यावर शोध मोहीम थांबवण्यात आली होती.
निलेश व अश्विनी यांचा विवाह अवघ्या तीन महिन्यांपूर्वी म्हणजे मे महिन्यात झाला होता. निलेश चिपळूण शहरात मोबाईल दुरुस्ती व विक्रीचा व्यवसाय करत होता. पती-पत्नी पाग येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास होते.