(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री राम सेवक मंडळ, पाचल यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या भव्य ध्वजस्तंभाचे अनावरण आज उत्साहात पार पडले. मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात सामाजिक एकतेचे वातावरण निर्माण झाले.
या वेळी भगवा ध्वज फडकवताच उपस्थितांनी जयघोष करत आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाला गावातील मान्यवर नागरिक, युवक, ज्येष्ठ मंडळी तसेच श्री राम सेवक मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजस्तंभ उभारणीमागे सामाजिक एकता, सांस्कृतिक मूल्ये आणि राष्ट्रप्रेम जपण्याचा उद्देश असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. या उपक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराला नवे ऐतिहासिक व प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले आहे.

