(विशेष /प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसी पुन्हा एकदा पर्यावरणीय वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ या रासायनिक कंपनीकडून तयार करण्यात येणाऱ्या ‘पीफास’ (PFAS) या अतिघातक रसायनाच्या उत्पादनाविरोधात गेल्या ११३ दिवसांपासून पंधरा गावांतील ग्रामस्थ कंपनीसमोर धरणे आंदोलन करत आहेत. जल, जमीन, जंगल आणि मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारे हे उत्पादन तातडीने बंद करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली असून राज्य सरकार, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच लोकप्रतिनिधींकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आता राष्ट्रीय हरित लवादाचे दार ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गालगतच्या लोटे परशुराम एमआयडीसीत जुलै २०२३ पासून Laxmi Organic Industries Ltd. या कंपनीकडून विविध रासायनिक उत्पादनांचे उत्पादन सुरू आहे. मात्र काही महिन्यांपूर्वी ‘पीफास’ या अत्यंत धोकादायक रसायनाच्या निर्मितीस सुरुवात झाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. लोटे, खेड, घाणेकुट, धामणदेवी, सोनगाव, कोतवली, चिरणे आदी गावांतील नागरिकांनी या उत्पादनाला विरोध दर्शवत ‘कोकण नागरी संघर्ष समिती’ आणि ‘लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती’ची स्थापना केली. ‘पीफास’ ही रसायने दीर्घकाळ पर्यावरणात टिकून राहणारी असून मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात, असा दावा आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. या रसायनामुळे इटलीमध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकांना दीर्घकालीन आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागल्याचा उल्लेख आंदोलक करत आहेत. त्यामुळे जगातील अनेक देशांनी या उत्पादनावर निर्बंध किंवा बंदी घातल्याचा दावा समितीकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, कंपनीत सुमारे १२० कामगार कार्यरत असून त्यातील काही कामगार स्थानिक गावांतील असल्याने उत्पादन प्रक्रियेबाबत ग्रामस्थांमध्ये अधिक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या इतर रसायन उत्पादनांना विरोध नव्हता; मात्र ‘पीफास’ उत्पादनामुळे परिसरातील पाणी, माती आणि पर्यावरण धोक्यात येणार असल्याने नागरिक रस्त्यावर उतरले,” असे संघर्ष समितीचे पदाधिकारी सांगतात. गेल्या आठवड्यात हजारो ग्रामस्थांनी मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तीव्र उन्हात सुरू असलेल्या धरणे आंदोलनात महिला, शेतकरी, युवक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. “काही लोकप्रतिनिधींची कंत्राटे कंपनीत असल्याने आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे,” असा आरोपही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.
कोकण नागरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते राजेंद्र गोपीनाथ आंब्रे म्हणाले, “पीफास उत्पादनामुळे ग्रामस्थांच्या गळ्याभोवती मृत्यूचा फास आवळला जात आहे. १५ गावांचा या उत्पादनाला तीव्र विरोध आहे. शासन आणि प्रशासन दखल घेत नसल्याने आता राष्ट्रीय हरित लवादाकडे न्याय मागणार आहोत.” पर्यावरण, आरोग्य आणि औद्योगिक विकास यांच्यातील समतोलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून लोटे परिसरातील हे आंदोलन आता राज्यव्यापी चर्चेचा विषय बनू लागले आहे.

