(दापोली)
फर्स्ट टेक चॅलेंज नॅशनल रोबोटिक चॅम्पियनशिप गुरुग्राम, हरियाणा, गुजरातपासून ओरिसापर्यंत तसेच दिल्लीपासून श्रीलंकेपर्यंतच्या नामांकित व गुणवंत संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अशा प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय स्पर्धेत कोकणातून एकमेव संघ म्हणून “Team Creation” श्रीराम शिक्षण संस्थेचे आर. जी. पवार हायस्कूल, माटवण ता. दापोली यांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट आणि लक्षवेधी कामगिरी केली.
गेल्या पाच वर्षांतील सातत्यपूर्ण, दर्जेदार व प्रेरणादायी सहभागाच्या मान्यतेपोटी या संघाला “Unstoppable Spirit Award” ने सन्मानित करण्यात आले. ही केवळ शाळेसाठीच नव्हे तर संपूर्ण दापोली तालुका आणि कोकण विभागासाठी अत्यंत अभिमानाची व गौरवास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्य, जिद्द आणि नवोन्मेषी विचारसरणीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल आर. जी. पवार हायस्कूल, माटवणच्या संपूर्ण टीमचे तसेच शाळेचे मुख्याध्यापक संभाजी कोंडीकिरे आणि मार्गदर्शक विवेक महाडिक तसेच रोहित कदम यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले जात आहे . त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधनवृत्ती जोपासण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच हे यश शक्य झाले आहे. भविष्यातही शाळेचा व कोकणाचा नावलौकिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी श्रीराम शिक्षण संस्था माटवण प्रयतशील आहे.
स्पर्धेमध्ये भाग घेताना अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली. त्यामध्ये श्रीराम शिक्षण संस्था माटवण, शाळेचे माजी विद्यार्थी विनोद महाडीक, विनय शेडगे, विज्ञान महाडीक, बंड्या शेलार, महेश दळवी, खाडे तसेच कोमल दळवी आणि कुटुंबीय ठाणे यांच्या कडून विशेष सहकार्य लाभले. सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील मोलाची मदत केली .
स्पर्धेचे संयोजक अश्विन सावंत यांच्या बहुमोल सहकार्याशिवाय या स्पर्धेचा विचारही करू शकत नाही . शाळा आणि संस्थेने अश्विन सावंत विशेष आभार मानले. संस्थेचे अध्यक्ष विजय पवार तसेच सर्व पदाधिकारी व संचालक यांनी सर्व सहभागी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे विशेष कौतुक केले

