(रत्नागिरी /प्रतिनिधी)
क्रांतीनगर परिसरातील कचराकुंडीत सापडलेले नवजात बालक सध्या पूर्णतः सुरक्षित असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. या बालकाच्या उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची विशेष टीम दक्षतेने कार्यरत असून बालकावर आवश्यक ती वैद्यकीय देखभाल केली जात असल्याचे नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी शहरातील क्रांतीनगर येथे दोन दिवसांपूर्वी कचराकुंडीत नवजात बालक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनेनंतर तत्काळ या बालकाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अद्याप या बालकाचे पालक सापडले नसून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्यासह नगरपरिषदेच्या सर्व महिला नगरसेविकांनी सोमवारी (दि. १२) सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयास भेट देत बालकाच्या प्रकृतीची माहिती घेतली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांनी बालकाचे वजन सुमारे २.५ किलो असून त्याची तब्येत सध्या चांगली असल्याचे सांगितले. योग्य उपचार आणि काळजीमुळे बालक पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.
या भेटीदरम्यान नगरसेविका पूजा पवार, श्रद्धा हळदणकर, वैभवी खेडेकर, प्रिती सुर्वे, मेधा कुलकर्णी, आफ्रिन होडेकर, सुप्रिया रसाळ, वर्षा ढेकणे, निवेदिता कळंबटे, स्मितल पावसकर, रुक्सार खान, जगृती पिलणकर, मानसी करमरकर, सायली पाटील, नाहीदा सोलकर तसेच पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक सागर भिंगारे आणि युवा सेना उपशहरप्रमुख युवराज शेट्ये उपस्थित होते.
दरम्यान, या घटनेने समाजमन हेलावून टाकले असून नवजात बालकाच्या भवितव्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी यावेळी सांगितले.

