( दापोली )
दापोली तालुक्यातील आंजर्ले समुद्रकिनारी फिरायला आलेल्या पुण्यातील २२ वर्षीय महिला पर्यटकाचा समुद्रात पोहताना बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (१० मे) सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथून १२ जणांचा एक ग्रुप आज पहाटे ४ वाजता आंजर्ले येथे पर्यटनासाठी रवाना झाला होता. सकाळी ११ वाजता ते आंजर्लेला पोहोचले. स्थानिक रिसॉर्टवर नाश्ता केल्यानंतर सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास संपूर्ण ग्रुप समुद्रात पोहण्यासाठी गेला. पोहत असताना अचानक एक मोठी लाट आल्याने ग्रुपमधील तन्वी निलेश पारखी (वय २२, रा. विश्रांतीवाडी, पुणे) ही पाण्यात बुडाली. ती अचानक समोर दिसेनाशी झाल्यावर तिच्या मित्रांनी तत्काळ किनाऱ्यावरच्या ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी त्वरीत पाण्यात उतरून तन्वीला शोधून बाहेर काढले. मात्र ती तेव्हा बेशुद्ध अवस्थेत होती.
तन्वीला तातडीने दापोली उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी व पर्यटकांनी समुद्रात उतरताना सावधगिरी बाळगावी व अनोळखी अथवा धोकादायक भागात पोहण्यासाठी जाणे टाळावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. विशेषतः मोठ्या लाटा, समुद्रात अचानक निर्माण होणारा खड्डा, वाढता प्रवाह व अनपेक्षित हवामान पाहता, जीवितहानी टाळण्यासाठी समुद्रात जाणे टाळावे, असे आवर्जून सांगण्यात आले आहे.

