(साखरपा)
संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी–नागपूर महामार्गावर, मुर्शी येथील गोवरेवाडी फाट्यानजीक आज सकाळी अकरा ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या रत्नागिरी येथे उपचार सुरू आहेत.
कराडहून रत्नागिरीकडे जात असलेली बोलेरो पिकअप (एमएच 50 एम 5777) सिद्दीक अय्याज मुल्ला (वय 26, रा. कराड) यांच्या ताब्यात होती. महामार्गावर वाहनावरील ताबा सुटल्याने बोलेरोने समोरून येणाऱ्या इको कारला (एमएच 11 डीए 5275) जोरदार धडक दिली. या धडकेमुळे इको कारने रिक्षाला (एमएच 08 ई 8438) धडक दिली, ज्यामुळे रिक्षा रस्त्यावर पलटी झाली.
या अपघातात रिक्षामधून प्रवास करणारी शाळकरी मुले, अंगणवाडी सेविका आणि रिक्षाचालक जखमी झाले. जखमींमध्ये गंगाराम तुकाराम शिंदे (वय 62, रा. कोंडगाव), तन्वी राजू कांबळे (वय 11), स्वरा सचिन कांबळे (वय 12, रा. दक्खन बौधवाडी) आणि दीपाली दिलीप कनावजे (वय 55, रा. मुर्शी) यांचा समावेश आहे.
सर्व जखमींना प्रथम साखरपा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच साखरपा दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.

