(देवरुख / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील भक्तीपरंपरेला उजाळा देणारा आणि वारकरी भाविकांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेला भव्य पायी दिंडी सोहळा यंदा आज (सोमवार) रोजी संपन्न होत आहे. या सोहळ्याचे आयोजन श्रीमत् भागवत नाम संप्रदाय मंडळ, मुरादपूर आणि संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
या दिंडीचे प्रस्थान श्री राधाकृष्ण मंदिर, मुरादपूर येथून श्रावण शुद्ध चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर होणार असून, अंतिम ठिकाण आहे कोकणातील श्रद्धास्थान श्री क्षेत्र मार्लेश्वर. दिंडीची सुरुवात सकाळी मुहूर्त वेळी श्रींच्या नामस्मरणाने व टाळमृदंगाच्या गजरात होणार आहे. संपूर्ण मार्ग भक्तिरसाने ओथंबणार असून, महिला-पुरुष, लहानथोर सर्व भाविकांनी या दिंडीत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या पायी तिर्थयात्रेचे प्रेरणास्थान म्हणजे ह.भ.प. वैकुंठवासी तुकाराम महाराज काजवे यांचे आध्यात्मिक मार्गदर्शन, तर दिंडीच्या प्रमुख समितीत अध्यक्ष ह.भ.प. रमेश महाराज बांडागळे (मुरादपूर) ह.भ.प. संजय महाराज कानाल (चिखली), खजिनदार ह.भ.प. सुनिल महाराज करंडे गुरुजी (माळवाशी), ह.भ.प. नंदकुमार महाराज लिंगायत (तुरळ) हे सेवाभावी सदस्य कार्यरत आहेत.
“पायी तिर्थयात्रा घडो । देह संताघरी पडो ।।” या संतवाणीप्रमाणे, जीवनात भक्तीमार्ग साकार करण्याचा हा एक सुंदर प्रसंग असून, संगमेश्वर तालुक्यातील सर्व अबालवृद्ध, वारकरी बंधु-भगिनींनी या पावन दिंडीत सामील व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.