(संगमेश्वर)
तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्याच्या कामामुळे निर्माण झालेल्या चिखलामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पावसामुळे चिखल साचून अपघाताचा धोका निर्माण झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर सरपंच विशाखा कुवळेकर यांनी ठेकेदार कंपनी ए. आर. कन्स्ट्रक्शन ला तातडीने रस्ता पूर्ववत करण्याचे लेखी निर्देश दिले आहेत.
ए. आर. कन्स्ट्रक्शन कंपनी पुणे येथील असून, कडवई ते ओकटेवाडी आणि घोसाळकरकोंड रस्त्यांचे काँक्रीटीकरण व गटारे, कॉजवे बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, अवकाळी पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर चिखल साचल्याने स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या तक्रारींची दखल घेत सरपंच कुवळेकर यांनी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अक्षय बरवल यांना पत्र देऊन रस्त्याची तात्काळ डागडुजी करून वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश दिले. याशिवाय, कंपनीच्या डंपर चालकांकडून बेजबाबदार वाहनचालना होत असल्याच्या तक्रारीही आल्याने, चालकांना समज देण्याचेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. या पत्रवहनावेळी स्थानिक ग्रामस्थ जितेंद्र चव्हाण, विजय कुवळेकर, रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण, नजीर शेख, बाबू चोपडे, बंड्या मयेकर आदी उपस्थित होते.

