(रत्नागिरी / संगमेश्वर)
जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या बळावर ग्रामीण भागातील तरुणही आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण संगमेश्वर तालुक्यातील काटवली गावच्या सुजित जाधव यांनी घालून दिले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) संगमेश्वरचा माजी विद्यार्थी असलेल्या सुजितची स्पेनमधील नामांकित आंतरराष्ट्रीय पॅसेंजर शिप कंपनीमध्ये ‘असिस्टंट प्लंबर’ पदासाठी निवड झाली आहे.
या नियुक्तीमुळे सुजितला प्रतिमहा एक लाख रुपयांपेक्षा अधिक वेतन मिळणार असून, त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे आयटीआय संगमेश्वरसह संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचा गौरव झाला आहे. एका छोट्याशा ग्रामीण भागातून थेट आंतरराष्ट्रीय शिपिंग क्षेत्रात पोहोचलेल्या सुजितच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
कौशल्याधारित शिक्षणालाच भविष्यात अधिक संधी
आपल्या यशाविषयी बोलताना सुजित जाधव यांनी आजच्या तरुणांना महत्त्वाचा संदेश दिला. ते म्हणाले, “केवळ पदवी मिळवण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाचे कौशल्य विकसित करणे अधिक महत्त्वाचे आहे. भविष्यात फिटिंग, प्लंबिंग, वेल्डिंग, सुतारकाम, इलेक्ट्रिकल आणि यांत्रिक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाला जगभरात मोठी मागणी राहणार आहे.”
‘एआय’ मानवी कौशल्याची जागा घेऊ शकत नाही
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) कितीही विकसित झाले, तरी प्रत्यक्ष तांत्रिक आणि व्यावहारिक कौशल्याची जागा ते घेऊ शकत नाही, असा विश्वासही सुजित यांनी व्यक्त केला. त्यामुळे तरुणांनी व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य देत आयटीआयसारख्या संस्थांमधून दर्जेदार कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन त्यांनी केले.
योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर जागतिक स्तरावर करिअर घडवता येते, हे सुजित जाधव यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याधारित शिक्षणाबाबत नवा आत्मविश्वास आणि उत्साह निर्माण झाला असून, आयटीआय शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक होण्यास मदत होणार आहे.

